खेड | प्रतिनिधी:
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, शुद्ध हवा मिळावी तसेच वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची गरज लक्षात घेऊन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने बिजघर येथील साईधाम परिसरात नागरिकांना विविध प्रकारच्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला. बिजघर गावात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, प्रत्येक घरासमोर आणि सार्वजनिक ठिकाणी झाडे लावली जावीत, तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने नागरिकांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
यावेळी प्रशासक शुभांगी भोसले, कॅप्टन राजारामराव भोसले, सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, गावचे मानकरी सुनीलराव भोसले, निवृत्त महिला पोलीस अधिकारी सुप्रियाताई भोसले, राजेंद्र भिकाजीराव भोसले, राजेंद्र वामन भोसले, संजय दत्त राम भोसले, दशरथ भोसले, चंद्रकांत भोसले, गावचे पुजारी भगवान जंगम स्वामी, बिजघर क्रमांक १ शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, सहशिक्षक शैलेश पराडकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला असून, भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. गाव हरित करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











