विद्यार्थी झाले विक्रेते, पालकांकडून भाजी खरेदी करून प्रतिसाद
लांजा (प्रतिनिधी) : निसर्गाशी नाते जोडत पारंपरिक आणि पौष्टिक रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांच्यामध्ये व्यवहारज्ञान, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि उद्योजकतेची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे आज ‘रानभाज्यांचा बाजार’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थीच या बाजारातील विक्रेते झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातून विविध प्रकारच्या रानभाज्या आणून त्यांची आकर्षक पद्धतीने मांडणी केली होती. विविध रानभाज्यांची माहिती, त्यांचे स्थानिक महत्त्व, पौष्टिक गुणधर्म आणि उपयोग सांगत विद्यार्थ्यांनी उत्साहाने ग्राहकांशी संवाद साधला. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रानभाज्यांची खरेदी केली.
या उपक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग ,संस्थेचे संचालक महम्मद रखांगी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. आजगावकर , उपमुख्याध्यापक श्री. वाघाटे , पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष कृतीतून शिकावे, स्थानिक निसर्गसंपदा आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी, तसेच खरेदी-विक्रीच्या माध्यमातून व्यवहारज्ञान प्राप्त व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात पारंपरिक रानभाज्यांचा आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर अनुभव पाहायला मिळाला.
‘निसर्गाची देणगी जपूया, रानभाज्यांचे महत्त्व जाणूया’ असा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक आणि अनुभवसमृद्ध ठरला












