आयशर टेम्पोसह चालक ताब्यात
कणकवली : गोवा येथून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या आयशर मालवाहू टेम्पोवर महामार्ग पोलीसांनी कारवाई करत तब्बल ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील चराठे-टेंबवाडी येथील नितीश रमेश तांबोसकर (वय ३७) याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रविवारी (२ ऑगस्ट) दुपारी ३.५५ वाजण्याच्या सुमारास तळेरे औदुंबरनगर येथे गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर करण्यात आली. महामार्ग पोलीस मदत केंद्र, कसाल येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शांताराम गवस हे सहकाऱ्यांसह महामार्गावर गस्त घालत असताना संशयित आयशर मालवाहू टेम्पो (क्र. एमएच ४२ बीयू १२५०) थांबवून तपासणी केली. त्यावेळी टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे ८०० बॉक्स आढळून आले.
या बॉक्समध्ये प्रत्येकी १८० मिली क्षमतेच्या ४८ बाटल्यांप्रमाणे एकूण ३८ हजार ४०० कंपनी सीलबंद बाटल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ३८ लाख ४० हजार रुपये असून आयशर मालवाहू टेम्पोची किंमत १७ लाख रुपये आहे. असा एकूण ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, हवालदार विजय बिर्जे, हवालदार एकनाथ सरमळकर, पोलीस नाईक नितीन शेट्ये, पोलीस शिपाई खडपकर व पोलीस शिपाई सागर परब यांनी सहभाग घेतला.












