गुरूप्रती निष्ठा,श्रद्धा आणि विश्वास ठेवा -प्रा.वैभव खानोलकर 

विठुदास संगीत विद्यालय गुरूपौर्णिमा सोहळ्यात प्रतिपादन

 मसुरे l प्रतिनिधी :    गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ आहे. आई-वडिलांनंतर आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे महान कार्य गुरु करतात.

गुरुंच्या चरणी असलेली श्रद्धा निष्ठा संकटाच्या काळातही योग्य मार्गावर चालण्याचे बळ देतो.अशी भावना नुकतीच मालवण , कट्टा येथील भक्ती मंगल कार्यालय गुरामवाडी या ठिकाणी संपन्न झालेल्या गुरूपौर्णिमा सोहळ्यात प्रा वैभव खानोलकर यांनी व्यक्त केली.

विठूदास संगीत विद्यालय सिंधुदुर्ग आयोजित बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांच्या शिष्यगणांनी गुरूपौर्णिमा सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले होते.

या सोहळ्यात भजनी बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांच्या संगीत विद्यालयाचे ओरोस कणकवली,मालवण कट्टा ,मसुरे येथील अनेक शिष्य सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरवात गणेश पुजनाने झाली त्यानंतर गुरूपाद्य पुजा तसेच अभिवादन सोहळा संपन्न होत असताना अनेक शिष्य आपल्या सादरीकरणातुन रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा वेध घेत होती.

या सोहळ्यात उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोककला अभ्यासक आणि बाबाराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी ,रत्नागिरीत अध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या मनोगतात गुरुंबद्दल श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली.

श्रद्धा म्हणजे गुरुंच्या ज्ञानावर आणि त्यांच्या मार्गदर्शनावर असलेला अढळ विश्वास. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञानाची खरी प्राप्ती होत नाही तर निष्ठा म्हणजे गुरुंनी दिलेल्या मूल्यांचे, संस्कारांचे आणि शिकवणीचे प्रामाणिकपणे पालन करणे. केवळ शब्द ऐकणे नव्हे, तर ते आचरणात आणण असुन विश्वास हा गुरु-शिष्य नात्याचा मजबूत पाया असुन. शिष्याने गुरुंवर ठेवलेला विश्वास त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातो. गुरुंचे मार्गदर्शन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी असते, ही भावना मनात रुजली की जीवनातील प्रत्येक आव्हान सहज पेलण्याची ताकद मिळते. गुरु हे केवळ शिक्षण देत नाहीत, तर माणुसकी, संस्कार, शिस्त, संयम आणि चारित्र्य घडवतात. म्हणूनच गुरुंच्या चरणी श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास अर्पण करणे म्हणजे जीवन समृद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग होय असल्याचे ते यावेळी म्हणाले.

या गुरुपौर्णिमा साठी प्रमुख अतिथी म्हणून हभप सखाराम राणे महाराज हभप निवृत्ती मेस्त्री महाराज, विनायक ओरसकर, हभप बबन सावंत महाराज,बुवा आनंद करावडे आणि भजन क्षेत्रातील गुरूतुल्य व्यक्तीमत्व बुवा ज्ञानदेव मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते

जवळपास चाळीस वर्षे या भजन क्षेत्रातील योगदान देणाऱ्या आणि वारकरी संप्रदायायातुन आपल्या जिवनाची जडणघडण करणाऱ्या आणि सदैव उत्साही असणाऱ्या बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी यावेळी आपली उपस्थिती लावली.

या उद्घाटन सोहळ्याचे सुत्रसंचलन प्रा महेश धामापूरकर यांनी केले.