लांजा शहर समन्वय समितीचा यशस्वी पाठपुरावा, बुधवारी करण्यात आली जागेची पाहणी
संतोष कोत्रे
लांजा-: लांजा शहर समन्वय समितीच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे अखेर लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पदपथाचा मार्ग मोकळा झाला आहे. लांजा हायस्कूल ते तहसील कार्यालयाच्या आवारातून गोंडे सखल रोड पर्यंत 15 ऑगस्ट रोजी पर्यंत हा पदपथ तयार करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांनी दिले आहेत. याबाबतची प्रत्यक्ष पाहणी बुधवारी संयुक्तरित्या करण्यात आली .
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गासाठी उड्डाणपूल तयार करण्यात आला असून या उड्डाणपुलाच्या भरावाच्या भिंतीमुळे लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. एका बाजूला भिंत आणि अरुंद रस्ता, महामार्गाच्या सर्विस रोड वरून कंटेनर सारख्या अवजड वाहनांसह अन्य वाहनांची असलेली सततची रहदारी यातून वाट काढताना लांजा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुमारे ३००० विद्यार्थ्यांची कसरत होत आहे. त्यात भरीसभर म्हणून सध्या पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र चिखल आणि खड्डेमय झालेल्या सर्विस रोड वरून चालताना विद्यार्थ्यांचे कपडे खराब होत आहेत. चालताना त्यांची कुचंबना होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन लांजा शहर समन्वय समितीने यापूर्वीच झालेल्या बैठकीत हायवे प्रशासन आणि ठेकेदार कंपनी यांना लांजा हायस्कूल ते गोंडे सखल रोड पर्यंत विद्यार्थ्यांसाठी काँक्रीटचा पदपथ तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र त्यामध्ये प्रगती दिसून न आल्याने बुधवारी ५ ऑगस्ट रोजी शहर समन्वय समिती पदाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या जागेची पाहणी केली. यावेळी शहर समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष प्रसन्न शेटये
यांनी १५ ऑगस्ट पर्यंत हा पदपथ तयार करून देण्याची सूचना केल्या. तसे आश्वासन कंपनी आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यानि दिले. तर अशा प्रकारे पदपथ तयार करण्यासाठी लांजा तहसीलदार प्रियाका ढोले यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे
. अशाप्रकारे शहर समन्वय समितीच्या पाठपुराव्यामुळे लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चिखलातून चालण्याची समस्या लवकरच दूर होणार आहे.
दरम्यान या पदपथासाठी जागेची पाहणी करताना शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेटये , पदाधिकारी शेखर स्वामी, विजय कुरूप, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता श्री. रहाटे, ठेकेदार कंपनीचे मॅनेजर श्री शितलानी आदी उपस्थित होते.













