बांदा : प्रतिनिधी
डिंगणे येथील महादेव चंद्रकांत सावंत (वय ४५) यांचा गोव्यातील माशेल येथे झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने डिंगणे गावावर शोककळा पसरली आहे.
महादेव सावंत हे आपल्या दुचाकीवरून डिंगणे येथून गोव्यात नेहमीप्रमाणे कामावर जात होते. माशेल येथे समोरून येणाऱ्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावर कोसळले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर गोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी जीप चालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
महादेव सावंत यांच्या निधनाने डिंगणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.













