८० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप
आरोग्य उपक्रमातून जोपासली सामाजिक बांधिलकी
राजकोट मित्रमंडळ व लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या सहकार्यातून शिबीर
मालवण | प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्ती जपत विविध सामाजिक, आरोग्यविषयक तसेच जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविणारे मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या पुढाकारातून ८० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. सहदेव बापर्डेकर दातृत्वाचा अखंडित वाहणारा झरा आहेत. असे गौरवोद्गार यावेळी उपस्थितानी व्यक्त केले.
3 ऑगस्ट रोजी साजरा झालेल्या सहदेव बापर्डेकर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राजकोट मित्रमंडळ आणि लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नेत्र तपासणी शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी आवश्यक असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. हे चष्मे प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय, मालवण येथे ८० लाभार्थी नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे दृष्टीदोष असलेल्या गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या उपक्रमातून ‘वाढदिवस सामाजिक उपक्रमातून समाजासाठी उपयुक्त ठरविणे’ ही सहदेव बापर्डेकर यांची सेवाभावी वृत्ती अधोरेखित झाली. सामाजिक, आरोग्य, पर्यावरण आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या सेवाभावी कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
नगराध्यक्ष ममता वराडकर आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांसह उपस्थितानी सहदेव बापर्डेकर यांच्या वतीने सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांचे विशेष कौतुक केले. नागरिकांच्या आरोग्याची गरज ओळखून गरजू व्यक्तींना मोफत चष्मे उपलब्ध करून देणे हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्षा महेश कांदळगावकर, नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती तथा लायन्स क्लब सचिव पूनम चव्हाण, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, सुनील खांदारे, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर, राजू बिडये, जॉन नोरोना, शेखर गाड, भाई मांजरेकर, महेश सारंग, गणेश परब, मयू पाटकर, किसन मांजरेकर, दिलीप बिरमोळे, संजय नार्वेकर, पारितोष बापर्डेकर, रूपा बिडये यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.












