अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील अडचणी दूर करा

सकल मराठा परिवार’चे तहसीलदारांना निवेदन;
महामंडळ अधिक सक्षम करण्याची मागणी
राजापूर (वार्ताहर): मराठा समाजातील युवकांना उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजातील आर्थिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून महामंडळ अधिक सक्षम करावे, अशी मागणी ‘सकल मराठा परिवार, महाराष्ट्र’ यांच्या वतीने राजापूर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मराठा समाजाला ओबीसी समाजातील विविध शासकीय सवलतींचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करतानाच, आरक्षणाचा लाभ तसेच शिक्षण व नोकरी क्षेत्रातील संधी समाजातील विद्यार्थी व युवकांना उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
समाजातील मोठा वर्ग अल्पभूधारक, व्यवसायाभिमुख तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून आहे. अशा युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने सुरू असलेले आर्थिक विकास महामंडळ हे अत्यंत महत्त्वाचे साधन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाने आतापर्यंत उल्लेखनीय काम करत एक लाखांहून अधिक मराठा उद्योजक घडविले असून, हजारो कुटुंबांना आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. महामंडळाचे कामकाज डिजिटल माध्यमातून मोबाईल अॅपद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले असून, नुकताच ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र अलीकडच्या काळात महामंडळाच्या कामकाजात विविध आर्थिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने अनेक युवकांना योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. या अडचणींबाबत नरेंद्र पाटील यांनी वेळोवेळी सामाजिक माध्यमांतून आवाज उठवूनही त्यांच्या सूचनांकडे व मांडण्यात येणाऱ्या समस्यांकडे राज्य शासनाने अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे समाजामध्ये महामंडळाच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण झाली असून, हे महामंडळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची भावना निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन महामंडळाच्या आर्थिक व प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात, महामंडळ अधिक सक्षम करावे आणि मराठा समाजातील युवकांना उद्योग-व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळेल, यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना मराठा समाज सेवा संघ, राजापूरचे अध्यक्ष प्रकाश पवार, सदस्य जगदीश पवार, प्रफुल्ल सावंत, एकनाथ लाड, अजय तावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.