कणकवली गांजा विक्री प्रकरणात चौथा संशयित ताब्यात

कणकवली : शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने गांजा विक्रीप्रकरणी आतापर्यंतची मोठी कारवाई करत दोन संशयितांना गांजासह ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणातील तिसरा आणि मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जाणाऱ्या शुभम राणे याला कणकवली येथील त्याच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. आता या प्रकरणात कणकवली निम्मेवाडी येथील आणखी एका चौथ्या संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईनंतर गांजा विक्रीच्या या नेटवर्कचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासाची चक्रे आता घाटमाथ्याच्या दिशेने वळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे गांजा विक्रीच्या या प्रकरणात मोठे नेटवर्क किंवा बड्या व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाईतील शुभम राणे आणि सूर्यकांत घाडीगांवकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत गांजा कोठून आणला जात होता, त्याची विक्री कोणामार्फत केली जात होती तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास कणकवली पोलीस करत आहेत.

चौथा संशयित ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील पुढील तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून, गांजा विक्रीच्या या साखळीमागील मुख्य सूत्रधार कोण, याकडे आता लक्ष लागले आहे.