खेडमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात
खेड (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाची संततधार सुरू असतानाही खेडमध्ये भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. खेड तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाने झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या गायनाने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी तहसीलदार सुधीर सोनावणे, खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटविकास अधिकारी करपे, पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, पोलीस उपविभागीय अधिकारी सणस, पोलीस निरीक्षक अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, “कायदा आणि सुव्यवस्था राखणे म्हणजेच स्वातंत्र्य आणि संविधानाचा खरा सन्मान करणे होय,” असा संदेश दिला. प्रत्येक नागरिकाने देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या नुकत्याच झालेल्या कारगिल दौऱ्याचा अनुभव सांगताना योगेश कदम यांनी प्रत्येक भारतीयाने आयुष्यात किमान एकदा तरी कारगिलला भेट देऊन आपल्या सैनिकांचे त्याग आणि शौर्य प्रत्यक्ष अनुभवावे, असे आवाहन केले. कारगिलमध्ये शहीद झालेल्या २४ वर्षीय जवानाने आपल्या आईला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत त्यांनी जवानांच्या त्यागाची आणि देशप्रेमाची जाणीव करून दिली. “आई, मी आता परत येणार नाही; पण मला पुन्हा जन्म मिळाला तर मला सैनिक म्हणूनच जन्म घेऊ दे,” या भावनिक उद्गारांमधून त्या जवानाचे देशाप्रती असलेले समर्पण अधोरेखित होते, असे कदम यांनी सांगितले.
भावी पिढीवर देशभक्तीचे संस्कार करण्याचे आवाहनही योगेश कदम यांनी केले. आपल्या तीन वर्षांच्या मुलाकडून कुटुंबातील सर्व सदस्य दररोज राष्ट्रगीत म्हणवून घेत असल्याचा संदर्भ देत, पालकांनी मुलांना देशाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, सैनिकांचे शौर्य आणि स्वातंत्र्याचे खरे महत्त्व शिकवावे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी प्रणीत रिक्षा चालक-मालक संघटना, खेड-रत्नागिरी यांच्या वतीने नागरिकांसाठी मिठाई आणि जिलेबी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुसळधार पावसाची पर्वा न करता तिरंग्याला सलामी देत खेडकरांनी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह कायम ठेवला. देशभक्ती, जवानांच्या बलिदानाची जाणीव आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांची जबाबदारी या संदेशांनी खेडमधील स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष ठरला.













