रत्नागिरीच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे कोल्हापूर येथे निधन

मांडवी परिसरावर शोककळा; १२ वाजता निघणार अंत्ययात्रा 

रत्नागिरी:

रत्नागिरी नगरपरिषदेच्या भाजपच्या माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपिन शिवलकर यांचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रासह मांडवी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

साधारण आठ दिवसांपूर्वी सौ. राजश्री शिवलकर यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सौ. राजश्री शिवलकर यांनी भाजपच्या माध्यमातून नगरसेविका म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यानंतरही त्या राजकीय जीवनात सक्रिय होत्या.

त्यांच्या पश्चात पती बिपिन शिवलकर आणि दोन मुले असा परिवार आहे. आज दुपारी १२ वाजता मांडवी येथील त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार असून, मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.