मसुरे | झुंजार पेडणेकर :सध्याच्या धावपळीच्या युगात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली असताना मालवण तालुक्यातील माळगाव-हुमरोसवाडी येथील परब कुटुंबाने सामाजिक एकतेचा एक अद्वितीय वस्तुपाठ घालून दिला आहे. श्रावण महिन्यातील पहिल्याच सणाला, म्हणजेच नागपंचमीला येथील परब घराण्यातील तब्बल १७ कुटुंबांनी एकत्र येत ‘परब आद्यगृह’ या आपल्या सामायिक देवघरात नागराजाचे अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पूजन केले. वेगवेगळ्या घरात राहूनही मनाची आणि संस्कृतीची नाळ कशी घट्ट जोडून ठेवावी याचे एक अत्यंत प्रबोधनात्मक उदाहरण या परब परिवाराने संपूर्ण समाजासमोर ठेवले आहे.
नागपंचमीच्या औचित्याने परब बांधवांच्या स्वतंत्र असलेल्या ‘परब आद्यगृह’ या देवघराला भेट दिली असता, भक्तिमय वातावरणात नागोबाची पूजा संपन्न झालेली पाहायला मिळाली. या १७ कुटुंबांमध्ये दरवर्षी अत्यंत सामंजस्याने एका कुटुंबाला पूजेचा मुख्य मान दिला जातो. सोमवारी देखील गावी राहत असलेल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी आद्यगृहात येऊन नागराजाचे दर्शन घेतले. देवापुढे ठेवलेली दूध आणि लाह्यांच्या नैवेद्याची विविध भांडी ही या कुटुंबातील अथांग प्रेमाची व एकतेची साक्ष देत होती.
▪️गणेशोत्सव सुद्धा एकत्रच साजरा –
विशेष म्हणजे, या कुटुंबांची चुली आणि घरे वेगळी असली तरी त्यांचा कोणताही सण-उत्सव वेगळा साजरा होत नाही. अगदी भाद्रपदातील गणेशोत्सवही याच आद्यगृहात एकत्र होतो. भजनाच्या साहित्यापासून ते सणांच्या तयारीपर्यंत सर्व गोष्टी सामायिक असतात. या कुटुंबात व्यक्तिगत पातळीवर कोणालाही स्वतःच्या घरात सत्यनारायण पूजा घालण्याचा नियम नाही. सर्व धार्मिक विधी याच मूळ देवघरात पार पडतात.
नागपंचमी सणाच्या प्रसंगी मेघ:श्याम परब, सुदर्शन परब, श्रीकृष्ण परब, शिवाजी परब, रोहन परब, अनिल परब, महादेव परब, देविदास परब, दिपक चव्हाण यांच्यासह संपूर्ण परब परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यातील बहुतांश सदस्य कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असले, तरी गणेशोत्सवात संपूर्ण हुमरोसवाडी या परिवाराच्या वास्तव्याने गजबजून जाते. कुटुंबातील लहान-मोठा कोणताही निर्णय हा सर्वांच्या विचाराने आणि सहमतीनेच घेतला जातो हे या घराण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
▪️पुढच्या पिढीला संस्कारांचे बाळकडू –
आजच्या भौतिकवादी युगात जिथे एकाच छताखाली राहणारी माणसे विचारांनी दूर जात आहेत आणि जमीन जुमला व अहंकाराचे वाद न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत, तिथे माळगाव-हुमरोसवाडीच्या परब परिवाराने जपलेली ही ‘एकता’ डोळ्यात अंजन घालणारी ठरते. १७ चुली वेगवेगळ्या पेटत असूनही त्यांच्या भावनांची आणि भक्तीची चूल एकच आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. नात्यांमधील ओलावा कसा टिकवावा आणि पुढच्या पिढीला संस्कारांचे कोणते बाळकडू द्यावे, याचा वस्तुपाठच या कुटुंबाने घालून दिला आहे. परब बंधूंची ही अभेद्य ‘एकी’ केवळ कौतुकास्पद नसून, आज विघटित होणाऱ्या संपूर्ण मराठी समाजासाठी एक अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक मार्गदीप ठरत आहे.












