इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळण्यात यावे

सावंतवाडी नगर परिषदेच्या विशेष सभेत महत्त्वपूर्ण ठराव

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरावर भविष्यात येणाऱ्या संभाव्य निर्बंधांतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण ठराव सावंतवाडी नगर परिषदेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्षांनी सांगितले की, आयुष मंत्रालयाच्या ओपीडीसाठी मागणीनुसार वीज, पाणी आणि कर मोफत देण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. याच्या बदल्यात आयुष मंत्रालयाकडून मिळणाऱ्या केस पेपरची सुविधा सावंतवाडीतील शहरवासियांना मोफत उपलब्ध करून दिली जावी, असाही ठराव या सभेत करण्यात आला आहे. याशिवाय, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी आणि पारंपरिक गंजीफा कला यांना युनेस्कोकडून जागतिक सांस्कृतिक वारसा मानांकन मिळावे, यासाठी विशेष सभेद्वारे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या जागेतच ते व्हावे यासाठी नगर परिषदेचे पूर्ण सहकार्य असून युवराज लखमराजे भोंसले स्वतः या विषयात लक्ष घालत आहेत. नगर परिषदेने सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली असून आता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. याच सोबतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हे पंचतारांकित हॉटेल येत असल्याने या भागातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगर परिषदेच्या सभेस अनुपस्थित असलेल्या मुख्याधिकाऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रद्धाराजे भोंसले यांनी सांगितले की, सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. एसआयआरमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबली होती, परंतु येत्या दोन महिन्यांच्या आत सावंतवाडीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळेल अशी खात्री त्यांनी शेवटी व्यक्त केली.