चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट’च्या ग्रंथालय उभारणी प्रकल्पांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबडस (ता. खेड) येथील आंबडस विद्यालयाला एक लाख रुपये मूल्याची ३४८ उत्कृष्ट पुस्तके भेट देण्यात आली. या प्रसंगी दीपस्तंभ संस्थेचे रणजीत जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत यादव, सहाय्यक शिक्षक गणेश सावर्डेकर, कृष्णकांत कुंभारआणि ग्रंथालय विभाग प्रमुख संगीता चौगुले उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यालयाचे ग्रंथालय आता अधिक सुसज्ज आणि समृद्ध झाले आहे.
हा उपक्रम डॉ. शरयू तुळपुळे (पुणे) यांच्या आर्थिक सहयोगातून तसेच दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट (पुणे) आणि न्यू इंग्लिश स्कूल आंबडस यांच्या संयुक्त नियोजन, देखरेख व सहकार्यातून यशस्वीपणे पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने भेट देण्यात आलेल्या ३४८ पुस्तकांमध्ये खालील विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे: थोर नेते व समाजसुधारक: त्यांचे विचार आणि जीवनकार्य उलगडणारी चरित्रग्रंथ. क्रांतिकारक व वैज्ञानिक प्रेरणादायी जीवनप्रवास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन घडवणारी पुस्तके, विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल असे अभ्यासपूर्ण साहित्य. विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या या उपक्रमाचे आंबडस विद्यालय तसेच सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वाचनसंस्कृती पोहोचवणाऱ्या दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाला उपस्थितांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.













