साळशीच्या कन्येची देशसेवेसाठी उतुंगभरारी!

कु. सुमेधा साळसकर भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून रुजू

शिरगांव (प्रतिनिधी) :       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांची फलश्रुती साळशी-बौद्धवाडी येथील कु. सुमेधा सुधीर साळसकर हिच्या यशातून दिसून आली आहे. अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एअर फोर्स ऑफिसर म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून सुमेधा दिल्ली येथे भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून देशसेवेत रुजू झाली आहे.

सुधीर साळसकर व सौ. समीक्षा साळसकर यांच्या ज्येष्ठ कन्या सुमेधाचे हे यश साळशी गावासह देवगड तालुका आणि बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. छोट्याशा गावातील मुलीने भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून मिळविलेले हे यश पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

सुमेधाच्या यशाबद्दल साळशी बौद्धजन जीवनोन्नती मंडळ, साळशी मुंबई शाखेच्या वतीने सुमेधा तसेच तिच्या आई-वडिलांचा पुष्पगुच्छ, शाल व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी मुंबई शाखेचे अध्यक्ष तथा लेखक, गीतकार, संगीतकार व साहित्यिक प्रसाद साळसकर, माजी अध्यक्ष दिलीप (भाई) साळसकर, सचिव गौतम साळसकर, खजिनदार शरद साळसकर, उपाध्यक्ष सतीश साळसकर, तसेच अभिनय साळसकर, राजेंद्र साळसकर, संभाजी साळसकर व त्यांच्या सौभाग्यवती, विद्याधर साळसकर आणि प्रजाल साळसकर उपस्थित होते.

सुमेधाचे हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाची नवी पिढी उंच भरारी घेत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. तिचे यश असंख्य मुला-मुलींना प्रेरणा देणारे आहे असे प्रसाद साळसकर यांनी सांगितले.

कु. सुमेधा सुधीर साळसकर हिचे या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.