खेड (प्रतिनिधी) : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १३ वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेड शाखेने हत्येच्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयमार्फत करण्यात आला. तपासानंतर पुणे विशेष न्यायालयात खटला चालला असून, या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, या हत्येमागील सूत्रधारांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने अंनिसने नाराजी व्यक्त केली आहे.
दाभोलकरांची हत्या ही त्यांच्या विचारांना संपविण्यासाठी केलेला सुनियोजित कट असल्याचे न्यायालयीन निरीक्षण असतानाही सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाकडून अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांमध्येही सूत्रधारांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याने विवेकवादी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे समितीने म्हटले आहे.
तसेच दाभोलकर हत्या प्रकरणातील वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सुटका झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने उच्च न्यायालयात दाद मागावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधात कायदा लागू करण्यासाठी अंनिसने केलेल्या प्रयत्नांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. देशभरात वाढत असलेल्या बुवाबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी समितीने केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारांचा तातडीने शोध घेणे, संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कारवाई करणे आणि देशपातळीवर जादूटोणाविरोधी कायदा लागू करणे, या तीन प्रमुख मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत.













