नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक! वनपाल सदानंद परब

▪️जल संधारण सप्ताह निमित्त पोईप हाय.येथे मार्गदर्शन कार्यक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर :जल संधारण सप्ताहाच्या निमित्ताने इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मालवण वनपाल श्री. सदानंद परब यांनी जल स्त्रोतांच्या संरक्षणाचे महत्त्व आणि जल संधारणाची गरज यावर सविस्तर प्रकाश टाकला. वनपाल श्री. सदानंद परब म्हणाले, पाणी हेच जीवन आहे आणि वाढत्या प्रदूषणासह हवामान बदलाच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज बनली आहे. भविष्यातील भीषण पाणीटंचाई टाळायची असेल तर आजपासूनच जल संधारणाचे उपाय योजणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाण्याचा वापर जपून करणेच नव्हे, तर पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडे लावल्यास आणि ती जगवल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत होते. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसाला किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले.

तसेच, धामापूरचे वनरक्षक श्री. अतुल खोत यांनी मानव-वन्यजीव संघर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सापांची ओळख करून दिली. त्यांनी सापांचे निसर्ग आणि अन्नसाखळीतील (जीवचक्रातील) अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट करत, साप दिसल्यास त्यांना न मारता त्यांचे संरक्षण कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

या जनजागृतीपर कार्यक्रमासाठी इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईपचे मुख्याध्यापक श्री. कुंभार, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, बहुसंख्येने विद्यार्थी तसेच आरपीटी मालवणचे सदस्य आवर्जून उपस्थित होते.