रत्नागिरी:
आगामी रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीकरांसाठी खरेदीची पर्वणी ठरणाऱ्या ‘गारवा ग्रँड एक्झिबिशन’चा शानदार शुभारंभ माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात झाला. या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ‘क्वीन्स ग्रुप’च्या नामांकित महिलांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. तीन कर्तबगार महिलांनी नियोजन ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत स्वतः लक्ष घालून हे भव्य प्रदर्शन साकारले आहे.
या प्रदर्शनात एकाच छताखाली ९० पेक्षा जास्त स्टॉल्स उभारण्यात आले असून, पुणे, मुंबई आणि नाशिक येथील व्यापारी विविध उत्पादनांसह दाखल झाले आहेत. यासोबतच चंदूकाका सराफ, आयडीबीआय (IDBI) बँक, लोकमान्य मल्टिपर्पज बँक आणि प्रेस्टिज (Prestige) यांसारख्या नामांकित ब्रँड्सचाही प्रदर्शनात विशेष सहभाग आहे.
सणोत्सवासाठी लागणारे नवनवीन पद्धतीचे कपडे, आधुनिक व पारंपरिक दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, आकर्षक भेटवस्तू (गिफ्ट्स) यांची रेलचेल येथे पाहायला मिळत आहे. खरेदीसोबतच खवय्यांसाठी स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्सही उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय, सामाजिक बांधिलकी जपत दृष्टिहीन व्यक्तींसाठी आणि कर्करोग (कॅन्सर) जनजागृती व मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांचे (NGO) स्टॉल्स हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहेत. सणोत्सवाच्या खरेदीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.













