दीड कोटीचा निधी मंजूर करण्याची गौरव वेल्हाळ यांची मागणी
योजना उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांना निवेदन
गुहागर प्रतिनिधी:
सिंधुरत्न समृध्दी योजना २.० मधून गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथे सर्व सोयींनीयुक्त अद्ययावत मच्छी मार्केट उभारण्यासाठी अंदाजे दीड कोटी रुपये निधी मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ यांनी या योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्याकडे केली आहे.
शृंगारतळी लगतच्या सागरी किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय चालतो. परंतु, योग्य व प्रशस्त सुविधेअभावी स्थानिक मच्छीमार महिला व विक्रेते अनेक वर्षांपासून उघड्यावर किंवा तात्पुरत्या स्वरुपाच्या शेडमध्ये मच्छी विक्री करत आहेत. यामुळे विक्रेता आणि ग्राहक या दोघांची पावसाळ्यात व उन्हाळ्यात मोठी गैरसोय होते. सिंधुरन समृद्धी योजना ही कोकणातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि स्थानिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. आपण नेहमीच कोकणातील विकासकामांना व मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करुन श्रृंगारतळी येथील मच्छी मार्केटसाठी ‘सिंधुरत्न समृद्धी योजने मधून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वेल्हाळ यांनी केली आहे.
प्रस्तावित कामात समाविष्ट करावयाची मुख्य कामे स्वच्छ, हवेशीर आणि प्रशस्त विक्री ओटे व दालनबर्फ साठवणूक आणि कोल्ड स्टोरेज सुविधा (मच्छी टिकवण्यासाठी) मुबलक पाणी, वीज आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी अद्ययावत ड्रेनेज/एसटीपी सिस्टीम विक्रेते व ग्राहकांसाठी पार्किंग व्यवस्था अपेक्षित आहे.













