संतोष सावर्डेकर/चिपळूण:
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक पटलावर गेल्या काही वर्षात रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष तथा वाशिष्ठी डेअरीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव यांनी कार्यकर्तृत्वाची छाप पाडली आहे. विशेष म्हणजे यादव यांनी १९ ऑगस्ट २०१८ रोजी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. या एक वर्षाच्या कालखंडात संघटन विस्तारातून विश्वासाकडे आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी खेर्डी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. खेर्डी ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच पद भूषवताना खेर्डी गावच्या विकासाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना अल्पमताने पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, ते खचले नाहीत. काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची धुरा सांभाळीत काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र, नुसते राजकीय क्षेत्रात वावरून चालणार नाहीत. तर इथल्या शेतकरी, तरुणांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेतली. दरम्यान, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्याच्या दृष्टीने दूध डेअरी प्रकल्पाची गरज असल्याचे ते नेहमी बोलून दाखवत असत.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ अन शेतकरी व सुशिक्षित तरुणांना मिळाला रोजगाराचा राजमार्ग
यातून सुभाषराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून प्रशांत यादव व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी पिंपळीखुर्द येथे दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. हा प्रकल्प आज शेतकऱ्यांसाठी आधारवड तर सुशिक्षित तरुणांसाठी राजमार्ग ठरला आहे. यावरून यादव दांपत्याची दूरदृष्टी दिसून येते. इतकेच नव्हे तर प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ५ जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे भव्य कृषी महोत्सव आयोजन केले जाते. या कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी दिशा मिळत आहे.
तर दुसरीकडे प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून अल्पावधीत प्रदेश सरचिटणीस पद मिळवले. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून जोरदार लढत दिली.
नव्या राजकीय इनिंगला सुरुवात
राजकीय क्षेत्रात संघर्षातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. मात्र, भविष्याचा वेध घेता प्रशांत यादव यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या हजारो समर्थकांसह मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे, मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजप संघटन मजबूत करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
संघटनविस्तारातून जनविश्वासाकडे : प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाची वर्षभराची वाटचाल
भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या संघटनात्मक वाटचालीत प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. पक्षाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघटन मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे, या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी दक्षिणमध्ये पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना अधिक वेग मिळाल्याचे चित्र दिसून येते.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर यादव यांनी अनुभवी तसेच तरुण कार्यकर्त्यांचा समतोल साधत जिल्हा कार्यकारिणीची रचना केली. सुमारे शंभर पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. संघटन केवळ पदाधिकाऱ्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक गाव, बूथ आणि सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.
यादव यांच्या नेतृत्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पक्षविस्तार. विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या घटना त्यांच्या कार्यकाळात घडल्या. कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश असो किंवा जिल्ह्यातील विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश असो, या माध्यमातून दक्षिण रत्नागिरीतील भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न झाला आहे.
पक्ष संघटनेबरोबरच जनसंपर्कालाही यादव यांनी महत्त्व दिले. चिपळूण परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील कृष्णेश्वर-पाग येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. हे कार्यालय केवळ पक्षाचे कार्यालय न राहता कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी संवादाचे केंद्र बनावे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे.
यादव यांच्या नेतृत्वात पक्षाच्या विविध आघाड्या आणि मोर्चांनाही बळ देण्याचा प्रयत्न झाला आहे. ओबीसी मोर्चासह विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. सहदेव बेटकर यांची रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही त्याच संघटनविस्ताराचा एक भाग मानली जाते.
“राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि व्यक्ती शेवटी” या भूमिकेवर भर देत पक्षाची विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यादव यांनी व्यक्त केला आहे. पक्षाच्या कार्यक्रमांपासून आंदोलनांपर्यंत आणि संघटनात्मक बैठकींपासून जनसंपर्क उपक्रमांपर्यंत त्यांची सक्रिय उपस्थिती दिसून येते.
एकूणच, प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाची वाटचाल ही संघटनविस्तार, कार्यकर्त्यांचा समन्वय, नव्या नेतृत्वाला संधी आणि जनसंपर्क या चार प्रमुख आधारस्तंभांवर उभी राहिलेली दिसते. आगामी काळात रत्नागिरी दक्षिणमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढविणे, बूथस्तरापर्यंत पक्ष पोहोचविणे आणि जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेले राहणे, हे त्यांच्या नेतृत्वासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल. संघटनबळाला जनविश्वासाची जोड देत “शतप्रतिशत भाजप” या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा संकल्प त्यांच्या नेतृत्वाची पुढील दिशा ठरवणारा ठरेल. प्रशांत यादव यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!













