श्रावण सोमवार निमित्त रविदादा मित्रमंडळाची मनोरंजनाची पर्वणी
राजापूर (वार्ताहर): श्रावण सोमवार निमित्त आमदार किरण सामंत पुरस्कृत शिवसेना नेते रविंद्र नागरेकर यांच्या पुढाकाराने अनादी सिध्द शक्ती तुरा शाहीर समाज संघ, राजापूर प्रतिष्ठान, रविदादा सहयोगी मित्र मंडळ, युवा विकास किसान प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शक्ती-तुरा जाकडी नृत्याच्या सामन्याला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कोकणची अत्यंत जुनी आणि समृद्ध लोककला म्हणून ओळखली जाणारी ‘शक्ती तुरा’ ही परंपरा कालौघात काहीशी मागे पडत चालली आहे. या पारंपरिक कलेचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच आपला हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या उदात्त उद्देशाने राजापूर बाजारपेठेतील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर येथे नामवंत शाहिरांच्या या शक्ती तुरा नाचाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या राजापूर तालुक्यातील शक्तीवाले शाहीर विलास भाटले आणि लांजा येथील तुरेवाले शाहीर श्री. देवेंद्र झिमण यांच्यात हा शक्ती तुरा जुगलबंदीचा सामना आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजक रविंद्र नागरेकर, पोलीस निरिक्षक अमित यादव, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, सिईओ जितेंद्र पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, राजू नवाळे, सुप्रसिध्द शाहीर चाँद खान, शिवसेना युवा नेत्या अपुर्वा सामंत, पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश पुजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक संयोजक रविंद्र नागरेकर यांनी करून पुर्वी वाडीवाडीत असणारे जाकडी मेळ आता दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे या कलेला व्यासपीठ मिळावे आणि पुर्वी विठ्ठल मंदिरात दर श्रावणी सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाची परंपरा पुन्हा सुरू व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी दोन्ही शाहिरांनी आपल्या कला पथकासह आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली. प्रारंभी या दोन्ही शाहिरांचा मान्यवरांचे हस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नारायण मिरगुले, दिनेश सोडये, कृष्णा नागरेकर, सुधीर विचारे, सुभाष नवाळे, संतोष तांबे, गिरीष विचारे आदी उपस्थित होते. या सामना पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनादी शक्ती तुरा उन्नती मंडळाचे सचिव संतोष हातणकर यांनी केले.













