भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचे १३ तुकडेही ग्रंथात; डॉ. भीमराव आंबेडकर यांचे गौरवोद्गार
खेड(प्रतिनिधी) :नालासोपारा शहराचा सुमारे २६०० वर्षांचा बौद्धकालीन इतिहास, प्राचीन स्तूप, पुरातत्त्वीय स्थळे आणि उत्खननातून मिळालेल्या ऐतिहासिक अवशेषांची माहिती एका ठिकाणी संकलित करणारा ‘शूर्पारक–सोपारा : भारतातील प्राचीन बौद्ध नगरी’ हा ग्रंथ केवळ पुस्तक नसून महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे, असे गौरवोद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी काढले.
खेड तालुक्यातील रसाळगड येथील लेखक व ऍड डॉ. संतोष सखुबाई देवजी सावंत यांच्या संशोधन, लेखन आणि संकलनातून साकारलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे लेखकाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातच ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
सोपारा येथील प्राचीन बौद्ध स्तूपाच्या १८८२ आणि १८९८ मधील उत्खननांतून प्राप्त झालेल्या अवशेषांचे महत्त्व डॉ. आंबेडकर यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचे १३ तुकडे, कांस्य धातूच्या आठ मूर्ती, सोनेरी पत्र्यावरील बुद्धमूर्तीचा छाप, काचेचे मणी, सोन्याची फुले तसेच तांबे, चांदी, वालुकाश्म, स्फटिक आणि सोनेरी करंडक यांसारख्या महत्त्वपूर्ण वस्तूंची माहिती ग्रंथात समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
नालासोपारा येथील महाशिलालेख क्रमांक ८ व ९ तसेच मौर्यकालीन दगडी पेटी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात लेखकासोबत पाहिल्याचेही डॉ. आंबेडकर यांनी नमूद केले. तसेच द एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे सोपारा स्तूपाशी संबंधित अवशेषांचे प्रत्यक्ष निरीक्षण केल्याचे त्यांनी सांगितले.
शूर्पारक, सुप्पारक, सोपरक, सोपारा आणि आजचे नालासोपारा अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या प्राचीन नगरीचा इतिहास या ग्रंथातून पुरावे, संदर्भ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.
विस्मृतीत जाणारा अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला इतिहास जतन करण्यासाठी समाजातील सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले. बौद्ध स्थळे, स्तूप, पुरातत्त्वीय अवशेष आणि ऐतिहासिक खुणांच्या संवर्धनासाठी भारतीय बौद्ध महासभेची टीम पुरातत्त्व विभागाच्या संपर्कात राहून प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लेखक डॉ. संतोष सावंत यांनी विविध संस्थांशी पत्रव्यवहार, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रत्यक्ष संशोधनातून विखुरलेले ऐतिहासिक संदर्भ एका ग्रंथात एकत्र आणले आहेत. नालासोपाऱ्याचा प्राचीन बौद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा हा ग्रंथ दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डॉ. आंबेडकर यांनी व्यक्त केला.













