देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरातील खालची आळी येथील श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या वतीने शताब्दी वर्षा निमित्त गोकुळाष्टमीचे औचित्य साधून १ सप्टेंबर रोजी श्री महापुरूष प्रो गोविंदा चषक २०२६ दहीहंडी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यात प्रथमच अशी आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात येत आहे.
महापुरूष पारासमोर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. प्रथम क्रमांकास १५ हजार रूपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रूपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रूपये व प्रत्येकी आकर्षक चषक देवून सन्मानीत केले जाणार आहे. तसेच सहभागी सर्व संघांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी २६ रोजीपर्यंत मुदत आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी विकी मिशाळे ७३८५३१९२९७, सुमित रेवणे ९४२०२२८३८४, प्रशांत डिंगणकर ८००७९३०२१०, सागर सावंत ९५७९०४४४२१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंडळाला १०० वर्षांची परंपरा आहे. मंडळाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. शतक महोत्सवी वर्षांत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन अध्यक्ष अजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. गोकुळाष्टमी देखील मंडळाच्या वतीने जल्लोषात साजरी केली जाते. मंडळाचे ओटीवर गोकुळ पूजन, भजन करण्याची परंपरा असून आजच्या तरुण पिढीने ही परंपरा जपली आहे. मंडळाच्या महापुरूष गोविंद पथकाचे देवरूखसह रत्नागिरी जिल्ह्यात दबदबा आहे. मांडवी येथे होणाऱ्या स्पर्धेत ६ सेकंदात पाच थराची सलामी देत द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आहे. जिल्हयात शिस्तबध्द गोविंदा पथक म्हणून नावलौकीक आहे. देवरुख नगरीत प्रथम ७ थर लावण्याचा विक्रम पथकाच्या नावावर आहे.












