लांजा (प्रतिनिधी): दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसाठी कार्यरत असलेल्या दिव्यांग जनकल्याण संस्थेचा २ रा वर्धापन दिन नुकताच कुलकर्णी काळे छात्रालय लांजा च्या सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.सावली कुरूप, पंचायत समिती सभापती सौ.मानसी आंबेकर, लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, नगरसेवक योगेश कावतकर पंढरीनाथ मायशेट्ये, पंचायत समिती सदस्य दिपाली दळवी, साक्षी चव्हाण, एसटी डेपोचे अधिकारी प्रकाश झोरे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, आर एन पी फाउंडेशनचे समीर नाकाडे, संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे यांनी संस्थेच्या सन २०२४ ते२०२६ या कालावधीतील संस्थेचा कार्य अहवाल सादर केला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ.सावली कुरूप यांनी दिव्यांग समाज बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी लवकर सभा घेऊन त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. तर मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सभापती सौ. मानसी आंबेकर यांनी देखील तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी लवकरच तालुकास्तरावर एक बैठक घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. तर एसटी आगार कर्मचारी प्रकाश झोरे यांनी एसटी बस मधील दिव्यांग बांधवांच्या आरक्षण संदर्भात मार्गदर्शन केले.
या वर्धापन दिन कार्यक्रमांतर्गत सकाळी दिव्यांग सभासद बांधवांची नोंदणी, दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत नोंदणी अर्ज, तर दुपारी संस्थेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण धनावडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे उपाध्यक्ष किरण धनावडे दीपक बाईंग सचिव मयूर जाधव, सहसचिव युसरा पन्हाळेकर , कार्याध्यक्ष सचिन तांबे खजिनदार संतोष धुमक, तसेच सदस्य संजय कुडकर दिनकर मांडवकर, गणेश चव्हाण प्रकाश गुरव, चंदना गुरव मल्लिका जेठ्ठी, शगुप्ता यांनी मेहनत घेतली












