चतुरंगने उभारलेल्या स्वच्छतागृहातून स्वच्छतेचा संदेश- डॉ. विनय नातू

वहाळ शाळेत आधुनिक स्वच्छतागृहाचे हस्तांतरण
चिपळूण (प्रतिनिधी) : ‘स्वच्छ भारत’ अभियानातून अलिकडे स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण झाली आहे. एकेकाळी गावखेड्यात स्वच्छतागृहे नव्हती. मात्र, आता या अभियानामुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली आहे. कोरोनानंतर तर त्यामध्ये अधिकच जागृती आली आहे. चतुरंग प्रतिष्ठानने वहाळ शाळेमध्ये अद्ययावत असे स्वच्छतागृह बांधून विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध केली आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच स्वच्छतेच्या दृष्टीने हे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारताच्या विकासासाठी शिक्षणाबरोबरच स्वच्छतेकडेही लक्ष देणे जरूरीचे आहे. त्यात चतुरंगने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत चतुरंग प्रतिष्ठानच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे हस्तांतरण करण्यात आले. या कार्यक्रमाला भगिरथ संस्थेचे डॉ. प्रसाद केतकर, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटदरे, सारस्वत बँक चिपळूण शाखेचे व्यवस्थापक अमेय चांदोरकर, प्रदीप सुर्वे, मुख्याध्यापक श्री. मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. देवधर व डॉ. नातू यांच्या हस्ते स्वच्छतागृहाची प्रतिमा श्री. काटदरे व मुख्याध्यापक मिसाळ यांना सुपुर्द करून अनोख्या पद्धतीने या सुविधेचे हस्तांतरण पार पडले. यावेळी बोलताना डॉ. नातू म्हणाले, आत्ताच राज्य शासनाने जिल्हा नियोजनचा दहा टक्के निधी शाळांसाठी खर्चकरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निधी जि. प. की माध्यमिक शाळांसाठी आहे याचा खुलासा होणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी खरोखरच गरज असेल किंवा जी शाळा पुढची दहा ते पंचवीस वर्षे टिकेल अशाच शाळेमध्ये असा निधी खर्च व्हायला हवा. चतुरंग प्रतिष्ठानने लोकसहभागातून अद्ययावत असे स्वच्छतागृह या ठिकाणी उभे केले. त्यातून ग्रामीण भागातील मुलांना स्वच्छतेची महती पटेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांनी, कोकणातील पूर्वांपार चालत आलेल्या रूढी-परंपरा आणि पद्धतीविषयी आपल्या विनोदी शैलीत बोट ठेवून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखीत केले. पाण्यामध्ये मेडीक्लोरचा एक थेंब टाकल्यानंतर पाण्यातील सर्व जिवाणू मरतात. त्यामुळे त्याचे पालन करावे. त्याच पद्धतीने स्वच्छतागृहाचा वापर जास्तीत जास्त करावा. राज्य शासनाच्या निर्मल ग्रामपंचायत योजनेमुळे ही जागृती निर्माण झाली आहे आणि आता गावखेड्यामध्ये घर तेथे स्वच्छतागृह निर्माण झाले आहे.
भारत सुदृढ राष्ट्र बनवायचे असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे. तरीही आज भारतात दरवर्षी पाच लाख बालके हगवण, उलट्या, जुलाब यासारख्या रोगामुळे मृत्यूमुखी पडत असतात. त्यामुळे शासनाने शिक्षण आणि आरोग्यावर अधिक लक्ष देणे जरूरीचे आहे, असे मत व्यक्त करून चतुरंग प्रतिष्ठानने कोणताही शासकीय निधी खर्च न करता उभ्या केलेल्या या स्वच्छतागृह उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविकात विद्याधर निमकर यांनी, अशाच पद्धतीने कोकणातील दहा ते पंधरा शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात असे अत्याधुनिक स्वच्छतागृह उभे करण्याचा मानस आहे. त्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी स्वच्छतागृहाच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांचा नामोल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. इंद्रायणी दीक्षित आणि आभार वामन कुलकर्णी यांनी मानले. यावेळी चिपळूण, वहाळ परिसरातील चतुरंगचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.