घरफोडीचा गुन्हा नोंदवताच चिपळूण पोलिसांची जलद कारवाई; संशयित आरोपीला पहाटेच घातल्या बेड्या

चिपळूण:
तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथे एका बंद घराचे कुलूप उघडून कपाटातील तब्बल ४ लाख २० हजार रुपये किंमतीचे ३ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी गृहिणी शैला दिलीप तावडे (वय ४०, रा. मार्गताम्हाणे गोपाळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी नितेश अंकुश साबळे (वय ३१, रा. मार्गताम्हाणे गोपाळवाडी, सध्या रा. खांदाटपाली) याला बुधवारी पहाटे ३:०४ वाजता अटक केली आहे. फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने बंद घरात प्रवेश करून कपाटाचे लॉकर उघडून ही घरफोडी करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.