राष्ट्रहित जपताना लोकसंग्रह करणारी एकमेव पार्टी
चिपळूणमधील बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
चिपळूण (वार्ताहर ): भाजपा पार्टी ही एक विचारधारा आहे. वर्षानुवर्ष एकसंघतेने टिकून राहिलेली देशातील सर्वात मोठी पार्टी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रथम राष्ट्रहिताला सर्वतोपरी महत्व देत विकासातून लोकसंग्रह करणारी आणि पारदर्शक कारभार करणारी एकमेव पार्टी आहे. भाजप हा व्यक्तीवर नव्हे तर विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
चिपळूण शहरातील शिक्षक पतपेढीच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले की, या देशात अनेक संघटना आणि पक्ष आले. त्यांचा प्रवास झाला. पण त्याचा प्रवास काही वर्षाने वैचारिक पकड किंवा विचारधारेवर काम करण्याची घटना नसल्याने दिशाहीन झाले. मात्र, भाजपची घटना ही व्यक्तीवर अवलंबून नसून ती कार्यकर्त्यांवर असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी कार्यकर्ता कसा असावा याबाबत सांगितले की, भाजपा कार्यकर्ता पायाला भिंगरी, जिभेवर साखर आणि डोक्यावर नेहमी बर्फ ठेवून काम करणारा असावा. राष्ट्र हित डोळ्यासमोर ठेवून पक्ष जे विधायक आणि विकासाच्या दृष्टीने काम करते त्या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या १२ वर्षात जे कार्य केले ते या देशात या पूर्वी झाले नव्हते हे जनतेला पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राला लोडशेडींग मुक्त करणे, मुंबई मध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ५५ पूल बांधले, मेट्रोचे जाळे मुंबई आणि उपनगरात तयार केले, कोकण रेल्वेची १४ स्टेशन आधुनिक आणि सुंदर बनले, अटल सेतू, अशी किती तरी कामे केली आहेत. २०४७ ला विकसित भारत हे स्वप्न पार्टीने पहिले आहे. यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिस्तबद्ध काम केले पाहिजे. विरोधक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत आहेत. परंतु मोदींचे पारदर्शक कार्य हेच आपल्या पक्षाचे यश आहे. जगातील सर्व देश पंतप्रधान मोदींचा आदर करतात. भाजपा सरकारच्या काळात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने देशातील युवांच्या आशा, आकांक्षा आणि सामर्थ्याची दखल घेत त्यांना प्रगती, रोजगार, स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतीच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कारण युवाशक्ती हीच देशाला परम वैभवाकडे नेऊन जाऊ शकते ही जाणीव पंतप्रधान मोदींनी करून दिली आहे. आज देशातील युवावर्ग स्वतःचे स्वप्न साकार करण्याबरोबरच राष्ट्र निर्माणतही महत्त्वपूर्ण भूमिका त्याच्या बजावत आहे. युवकांच्या स्वप्नाना नवे बळ देतानाच शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातही केंद्र सरकारच्या धोरणांचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यावेळी त्यांनी मोदींच्या कार्याबद्दल, पार्टी कशी देशात एक नंबर आहे आणि कार्यकर्त्यांनी कसे काम केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले.
अनेकांचा भाजपा पक्ष प्रवेश
यावेळी चिपळूण येथील ॲड विश्वजित यादव, ॲड सविता माळी, मंडणगड येथील नगरसेवक सुभाष सापटे, नगरसेविका समृद्धी शिगवण, राजश्री सापटे, खेड येथील माजी सभापती विजय कदम, शिवसेना संपर्कप्रमुख खेड राजेंद्र निकम, खेड तालुका उप संघटक शिवसेना युवराज गुजर, एनवरे खेड उपसरपंच तानाजी पोफळकर, माणी खेड सरपंच राकेश शिंदे, भरणे युवक प्रमुख उबाठाअविनाश वाडेकर, याशिवाय चिपळूण मधील रेहेल भागडी मराठवाडी, गावठणवाडी आणि इतर गावातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला .या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाला आ. प्रमोद जठार, आ योगेश सागर, आ. निरंजन डावखरे, माजी आमदार डॉ विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, गुहागर नगराध्यक्षा नीता मालप, गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उपजिल्हाध्यक्ष अजित साळवी, बळीराम मोरे, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, जिल्हा परिषद सदस्या सौ रावी मोरे, महिला मोर्चा सौ स्मिता जावकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, किसान मोर्चा अध्यक्ष संतोष भडवळकर, वैभव खेडेकर, केदार साठे, संतोष नलावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत ताम्हणकर यांनी सुरेल केले.











