पेडणे अबकारी विभागाची कारवाई : चालक फरार
बांदा : प्रतिनिधी
गोव्याहून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात पेडणे अबकारी विभागाने मोठी कारवाई केली आहे. पत्रादेवी येथील गोवा-महाराष्ट्र सीमेवरील चेकनाक्यावर येणारा ट्रक (एमएच १४ ईएम ८९६९) अडवून त्यातून मॅकडॉवेल दारूचे सुमारे ४०० बॉक्स जप्त करण्यात आले. कांद्याच्या पिशव्यांच्या आडून दारूची वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईत उघड झाले. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोव्याहून महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक बाबत अबकारी अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानुसार पत्रादेवी चेकनाक्यावर ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. ट्रकच्या पुढील भागात कांद्याच्या पिशव्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. मात्र, अधिकाऱ्यांनी ट्रकच्या मागील भागाची कसून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स आढळून आले.
अबकारी अधिकायांच्या मार्गदर्शनाखाली ट्रकसह दारूसाठा ताब्यात घेण्यात आला. जप्त केलेल्या साठ्यामध्ये मॅकडॉवेल ब्रँडच्या १८० एमएल क्षमतेच्या बाटल्यांचे सुमारे ४०० बॉक्स असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, अबकारी विभागाची कारवाई सुरू असल्याची चाहूल लागताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. फरार चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूचा साठा कोठे नेण्यात येत होता आणि या वाहतुकीमागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास अबकारी विभागाकडून करण्यात येत आहे.
जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची नेमकी किंमत तसेच प्रकरणातील अन्य तपशील पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.
अबकारी निरीक्षक सलील वळवयकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विक्रांत कोरगावकर, निलेश गावडे, उदय गवस, सुनील कोरबोटकर, शाहू पावणे, अनिल गावकर आणि विठोबा नाईक यांच्यासह अबकारी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी चेकनाक्यावर अवैध दारू वाहतुकीविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या दारू वाहतुकीवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.













