पाईप क्लीनरपासून फुले बनवण्याचे प्रशिक्षण; खेड नगरपरिषद व महिला बालकल्याण समितीचा आगळावेगळा उपक्रम

खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषद आणि महिला बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पाईप क्लीनरपासून आकर्षक फुले बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच टाकाऊ अथवा सहज उपलब्ध साहित्याचा उपयोग करून सुंदर वस्तू तयार करण्याची कला आत्मसात करता यावी, या उद्देशाने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षणादरम्यान पाईप क्लीनरचा वापर करून विविध प्रकारची रंगीबेरंगी आणि आकर्षक फुले तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. सहभागी महिलांनीही प्रत्यक्ष सहभाग घेत फुले तयार करण्याचा अनुभव घेतला. घरबसल्या कमी खर्चात अशा प्रकारच्या सजावटीच्या वस्तू तयार करून त्यांचा उपयोग घराची सजावट तसेच विविध कार्यक्रमांसाठी करता येऊ शकतो. त्यामुळे या प्रशिक्षणाचा महिलांना दैनंदिन जीवनातही उपयोग होणार आहे.
महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ. रसिका खेडेकर तसेच समितीच्या सदस्यांच्या सहकार्याने हा प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पडला. खेडसारख्या छोट्या शहरात महिलांसाठी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि कौशल्यविकासाला चालना देणारे उपक्रम आयोजित होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, महिला बालकल्याण समिती आणि खेड नगरपरिषद यांच्या माध्यमातून लवकरच खेड शहरातील मुलींसाठी लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, स्वसंरक्षणाची प्राथमिक कौशल्ये विकसित करणे आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
खेड नगरपरिषद आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. नागरिकांनी अशा प्रशिक्षण व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून घ्यावा, असे नगरसेविका निता आंब्रे यांनी यावेळी सांगितले.
महिला व मुलींच्या कौशल्यविकासासोबतच त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे विविध उपक्रम आगामी काळातही राबविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासन व महिला बालकल्याण समितीच्या वतीने सांगण्यात आले.