सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी :सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची १९९५ साली उभारण्यात आलेली इमारत सध्या धोकादायक अवस्थेत असल्याचा दावा करत गोरगरीब रुग्णांना गोवा किंवा खासगी रुग्णालयात पाठविण्याची वेळ येऊ नये म्हणून ट्रामा केअर युनिटसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संरक्षण व विकास संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केली असून
या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती देऊन त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, हा या मागणीमागचा मुख्य उद्देश आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ट्रामा केअर युनिट सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील तज्ज्ञांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार या जुन्या इमारतीवर अतिरिक्त मजला बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे समोर आले आहे. तसेच इमारतीच्या छताचे तातडीने वॉटरप्रूफिंग करणे आणि अपूर्ण असलेले स्ट्रक्चरल रूफिंग पूर्ण करणे आवश्यक असल्याचे ऑडिट अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय रुग्णालयाच्या परिसरात बंद अवस्थेत असलेला डिझेल जनरेटर आणि ऑक्सिजन सिलेंडरचा साठा सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोकादायक ठरू शकत असल्याने ते अन्यत्र हलविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ती जागा मोकळी करून तेथे सर्व सोयींनी युक्त अशा अत्याधुनिक ट्रामा केअर युनिटची स्वतंत्र इमारत उभारल्यास रुग्णालयाची क्षमता वाढेल आणि नव्या वैद्यकीय यंत्रणांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
स्थानिक रुग्णांना उपचारासाठी परराज्यात किंवा महागड्या खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागू नये आणि सरकारी रुग्णालयातच उत्कृष्ट उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाने या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. या गंभीर आरोग्यविषयक प्रश्नावर प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास शेतकरी संरक्षण व विकास संघटनेच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असेही अण्णा केसरकर यांनी स्पष्ट केले.












