एसटी, वीज आणि रस्त्यांच्या प्रश्नांवरून अधिकारी धारेवर,गणेशोत्सवापूर्वी समस्या सोडविण्याच्या सूचना
पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जनता दरबाराचे आयोजन; सात दिवसांत नागरिकांच्या सूचनांची पूर्तता करण्याचे निर्देश
गणेशोत्सव काळात एसटी, वीज व बांधकाम विभागाने सतर्क राहण्याच्या सभापती गणेश राणे यांच्या सूचना
देवगड : प्रतिनिधी
एसटीचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड, स्मार्ट मीटर आणि रस्त्यांची दुरवस्था अशा एसटी, महावितरण व बांधकाम विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवरून देवगड पंचायत समितीच्या जनता दरबारात नागरिकांनी अधिकारीवर्गाला चांगलेच धारेवर धरले. केवळ स्मार्ट मीटर बसविण्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नका, तर महावितरणचा कारभारही स्मार्ट करा, अशा शब्दांत नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या समस्या, प्रश्न व सूचना तातडीने सोडवाव्यात, अशा सूचना सभापती गणेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार देवगड पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी इंद्रप्रस्थ हॉल येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप, जिल्हा परिषद गटनेते संजय बोंबडी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोज भोगटे, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे, विभागीय वाहतूक अधिकारी निलेश लाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शैलेश मोरसकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल तांबे, देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, विजयदुर्ग आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, देवगड महावितरण शाखा अभियंता छाया परब आदी अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात जनतेशी निगडित असलेल्या एसटी, बांधकाम विभाग आणि वीज वितरण या प्रमुख विभागांच्या प्रश्नांबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. याबद्दल सुरुवातीलाच पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर एसटीच्या प्रश्नांपासून जनता दरबाराच्या कामकाजाला सुरुवात झाली.
एसटीच्या प्रश्नांवर नागरिक आक्रमक
विजयदुर्गचे माजी उपसरपंच महेश बिडये यांनी विजयदुर्ग-पंढरपूर एसटी फेरी गेल्या तीन महिन्यांपासून अनियमित असून सध्या ही फेरी केवळ वैभववाडीपर्यंतच सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थीवर्गाचे मोठे हाल होत असून प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांनी गाड्यांची कमतरता असल्यामुळे ही फेरी वैभववाडीपर्यंत सुरू असल्याची माहिती दिली.
विभागीय वाहतूक अधिकारी निलेश लाड यांनी जिल्ह्यात सध्या एसटीच्या ७० गाड्या स्क्रॅपमध्ये असून आणखी ५० गाड्यांची मागणी करण्यात आल्याचे सांगितले. गणेशोत्सव काळात एसटीची सेवा सुरळीत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव काळात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांकडून बेसुमार भाडे आकारले जात असल्याने एसटीने गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वैभव करंगुटकर यांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले. स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करूनही दोन-दोन महिने कार्ड मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी तांत्रिक अडचणीमुळे काही कार्ड अन्य ठिकाणी गेली होती; मात्र आता ही समस्या सोडविण्यात आल्याचे सांगितले.
संदीप साटम यांनी स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी पंचक्रोशीत शिबिरे घेण्याची मागणी केली. प्रकाश राणे यांनी प्रत्येक गावात ही यंत्रणा राबवून ज्येष्ठ नागरिक व महिलांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना केली.
१४ सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणे महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटावर प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर नोंदणी करूनही एनसीएमसी कार्ड प्राप्त न झालेल्या लाभार्थ्यांना नोंदणीची पावती ग्राह्य धरून सवलतीच्या तिकिटावर ३० सप्टेंबरपर्यंत प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, कार्ड मिळेपर्यंत पूर्वीप्रमाणे सवलतीनुसार तिकीट देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विलास साळसकर यांनी नोंदणी केलेल्या पावतीवर आवश्यक माहिती स्पष्ट दिसत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. एसटी प्रशासनाने आपल्या समस्यांचे खापर नागरिकांच्या माथी मारू नये, असे सांगत गढीताम्हाणे एसटी फेरी सुरू ठेवण्यासाठी एसटी प्रशासनाकडून भारमानाचा अट्टाहास का केला जातो, असा सवाल त्यांनी केला. नारींग्रे सरपंच महेश राणे, शाम कदम, कौस्तुभ खाडीलकर, शेखर धुरी यांनीही एसटीच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.
हिरकणी कक्ष बंद; प्रवाशांच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह
देवगड आगारातील हिरकणी कक्षाचा वापर कशासाठी केला जातो, असा प्रश्न संतोष किंजवडेकर यांनी उपस्थित केला. हा कक्ष बंद अवस्थेत असून स्तनदा मातांना त्याचा उपयोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले. हा कक्ष एसटी प्रशासन आपल्या कार्यालयीन कामकाजासाठी वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना उद्धट उत्तरे दिली जात असल्याची तक्रार करत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
पोंभुळे सरपंच सौ. धावडे, शामल जोशी, इमरान साटविलकर, विजू कदम, कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर आदींनी एसटीच्या विविध प्रश्नांवर सूचना मांडल्या. खारेपाटण येथे देवगड-बोरीवली बसच्या बुकिंगची व्यवस्था करावी तसेच देवगड-कोर्ले वस्तीची फेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. लांब पल्ल्याच्या गाड्या सुस्थितीत पाठवाव्यात, अशी मागणी शामल जोशी यांनी केली. पेंढरीच्या सरपंचांनी खारेपाटण-विजयदुर्ग बस कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी केली. गोवळ येथील दिनेश मेस्त्री यांनीही गाड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
एसटीच्या पिकअप शेडची दुरवस्था झाली असून या शेडमध्ये मोटारसायकली उभ्या केल्या जात असल्याने त्याचा प्रवाशांना उपयोग होत नसल्याचे संतोष किंजवडेकर यांनी निदर्शनास आणून दिले. रमेश सरवणकर, भाई बांदकर यांनीही विविध सूचना मांडल्या.
स्मार्ट मीटरवरून महावितरणला जाब
ग्राहकांकडे सध्या सुरू असलेले वीजमीटर असताना स्मार्ट मीटर का बदलले जात आहेत, असा प्रश्न माणिक दळवी यांनी उपस्थित केला. यावर वाडा शाखा अभियंता माने यांनी नादुरुस्त मीटर बदलून त्याठिकाणी नवीन मीटर बसविले जात असून बळजबरीने मीटर बसविले जात नसल्याचे स्पष्ट केले.
हिंदळे येथील आरुख आगा यांनी घराला आग लागून १२ ते १३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याबाबत महावितरणकडे पाठपुरावा करूनही नुकसानभरपाईबाबत दखल घेतली नसल्याचे सांगितले.
गणेशोत्सव काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये आणि या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी सूचना संदीप साटम यांनी केली. हडपीड नळयोजनेला स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यामुळे सध्या वीजबिल दुप्पट आल्याकडे दाजी राणे यांनी लक्ष वेधले.
स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आग्रह धरतानाच महावितरणचा कारभारही स्मार्ट करण्याकडे लक्ष द्या, असे महेश राणे यांनी सुनावले. मुणगे नळयोजना ट्रान्सफॉर्मरअभावी गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याकडे मुणगे सरपंचांनी लक्ष वेधले. जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर यांनीही तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याची सूचना केली.
वाडा येथील शाखा कार्यालय बंद असते. तेथील शाखा अभियंता माने यांच्याबाबत अनेक तक्रारी असून त्यांना योग्य समज द्यावी, अशी सूचना सभापती गणेश राणे यांनी केली. पेंढरी येथील मंगेश आरेकर यांनी वीजमीटर बंद असतानाही चार हजार रुपयांचे बिल आकारण्यात आल्याचे सांगितले. हिंदळे गावात गेल्या चार वर्षांपासून कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होत असून वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या दुरवस्थेवरून बांधकाम विभागाला धारेवर धरले
रस्त्यांच्या दुरवस्थेवरून बांधकाम विभागालाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुणगे-आडबंदर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याकडे गोविंद सावंत यांनी लक्ष वेधले. यावर बांधकाम विभागाकडून निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. त्यावर सावंत यांनी, ‘यासाठी आम्ही लोकवर्गणी काढायची का?’ असा सवाल केला.
मिठबांव पूल ते मुणगे हायस्कूल हा रस्ता खड्डेमय झाला असून तो तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली. देवगड-जामसंडे शहरातील तिसरा डोळा बंद असल्याकडे विलास साळसकर यांनी लक्ष वेधले. गणेशोत्सव काळात दारूबंदी करावी, अशी मागणी संतोष किंजवडेकर यांनी केली.
पालकमंत्री करणार रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी
गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची पाहणी पालकमंत्री नितेश राणे स्वतः करणार आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने नादुरुस्त रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून गणेशोत्सवापूर्वी रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत करावेत, अशी सूचना सभापती गणेश राणे यांनी केली. नागरिकांनीही ओरोस येथील पालकमंत्री कार्यालयाकडे आपल्या लेखी सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवाशांसाठी कणकवली, वैभववाडीत एसटी गाड्या उपलब्ध कराव्यात
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून यावर्षीही ११ व १३ सप्टेंबर रोजी मुंबईहून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. या रेल्वेने येणाऱ्या देवगड तालुक्यातील प्रवाशांसाठी वैभववाडी रेल्वेस्थानकावर विजयदुर्ग आगाराने, तर कणकवली रेल्वेस्थानकावर देवगड आगाराने एसटी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना सभापती गणेश राणे यांनी केली.
गणेशोत्सव कालावधीत आरोग्य, वीज, एसटी आणि बांधकाम विभागाने सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या सूचनांची सात दिवसांत पूर्तता करावी, असे स्पष्ट निर्देश सभापती गणेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जनता दरबाराला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर यांनी केले.













