देवरूखात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाजातर्फे श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

देवरूख (प्रतिनिधी):

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज देवरुख आयोजित श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि आनंदात पार पडला. श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर देवरुख येथे सदर सोहळा साजरा करताना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे खजिनदार दिलीप विंचू यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदूंगाच्या नादाने हरीनामाच्या गजरात श्री संत नामदेव महाराज प्रतिमेच्या पालखीची मिरवणूक काढणेत आली. समाज बांधवांनी भजन सादर केले. महिलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले.

यावर्षी रत्नागिरी जिल्हा शिंपी समाज जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये देवरुखचे श्री. दत्तात्रय उर्फ बंडया मारुती भस्मे यांची एकमताने रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आणि नगरपंचायत देवरुखच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल श्री. सिद्धेश संजय वेल्हाळ यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचे आणि शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत मुलामुलींचे रोख रक्कम आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. श्री संत नामदेव महाराज यांच्या आयुष्याच्या जीवन प्रवासाबाबत सौ.तुप्ती अशोक कुमठेकर यांनी अतिशय सुंदर असे मार्गदर्शनपर भाषण केले.

मंडळाचे सभासद श्री. योगेश अरविंद वेल्हाळ यांनी आपल्या समाजाच्या प्रत्येक घरी श्री संत नामदेव महाराज यांची प्रतिमा असणे गरजेचे आहे. अशी संकल्पना करून सर्वाना श्री संत नामदेव महाराजांची प्रतिमा घरोघरी ठेवण्यासाठी दिली. त्यानंतर आरती झाली. सदर कार्यक्रमास संगमेश्वर तालुक्यातील बहुसंख्य शिंपी समाजबंधू भगिनीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व उपस्थित समाज बंधुभगिनींचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन करण्यासाठी श्री. चेतन पाडळकर, साहिल वेल्हाळ, दिलीप विंचू, माजी अध्यक्ष श्री. संजय वेल्हाळ यांनी अतिशय मेहनत घेतली. तसेच संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे खजिनदार श्री. दिलीप विंचू यांनी केले.