राजापुरातील भाजपची दहीहंडी फोडण्याचा मान हनुमान प्रसन्न शिवाभावा खडपेवाडी गोविंदा पथकाला दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांसह नागरिकांची मोठी गर्दी

हनुमान प्रसन्न शिवाभावा खडपेवाडी गोविंदा पथकाचा चार एक्क्यांचा थरार 
राजापूर प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भारतीय जनता पक्ष, राजापूरच्या वतीने रविवार ६ सप्टेंबर  रोजी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उत्सवात चार गोविंदा पथकांनी सात थर लावून सलामी दिली. त्यानंर चिठ्ठी काढून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाची निवड करण्यात आली असता हा मान शहरातील हनुमान प्रसन्न शिवा भावा खडपेवाडी पथकाला मिळाला व या पथकाने सात थर लावून ही दहीहंडी फोडली.
पंचायत समितीचे सभापती तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव यांनी चार एक्के लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी जाहिर केलेले विशेष पारितोषकही हनुमान प्रसन्न शिवा भावा खडपेवाडी पथकाने चार एक्के लावत थरारक कामगिरी पटकावले.
दहीहंडी फोडणाऱ्या हनुमान प्रसन्न शिवाभावा खडपेवाडी पथकासह या उत्सवात सात थरांचा थरार दाखविणाऱ्या न्यु हनुमान दिवटेवाडी, श्री कालिकादेवी माता गोविंदा पथक भू पंचक्रोशी यांसह सहा थर लावणारे जय हनुमान प्रसन्न आंबेवाडी व पाच थर लावणारे मारूती प्रसन्न आंबेवाडी या पथकांना रोख पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते या गोविंदा पथकांचा गौरव करण्यात आला.
या उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आ. जठार यांनी हा साहसी आणि विश्वासाचा खेळ असल्याचे नमुद केले.
राजापुर तालुका भाजपाच्या वतीने यावर्षी रविवारी एक लाखाची बक्षिसे असलेली दहीहंडी ठेवण्यात आली आहेत.  याला गोविंदा पथकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा राजापूर पंचायत समितीचे उपसभापती  अभिजित गुरव, तालुकाध्यक्ष मोहन घुमे, शहर अध्यक्ष शहराध्यक्ष सुशांत मराठे,  विवेक गुरव, शिवा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही या उत्सवासाठी परिश्रम घेत होते.
या दहीहंडी उत्सवाला मनोरंजनाचीही जोड देण्यात आली होती. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना जान्हवी तसेच ‘कलर्स मराठी ढोलकीच्या तालावर’ फेम खेडच्या सुकन्या निशा जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संपूर्ण उत्सवाचे नियोजन भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेटकेपणाने केले होते. गोविंदा पथकांची व्यवस्था, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा तसेच मनोरंजन कार्यक्रमाचे नियोजन यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. भाजपाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. राजापूरकरांचा या उत्सवाला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.