‘रिव्हर्स मायग्रेशन’ला मिळणार बळ, कोकणच्या पर्यटनाला नवी ‘लाईफ लाईन’

सिंधुदुर्गात आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक वेगवान, आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत जिल्ह्यातील सागरी, खाडी व नदीमार्गावरील जलवाहतुकीला चालना देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पर्यटन व्यावसायिक महासंघाने गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात आधुनिक जलवाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीला आता सकारात्मक दिशा मिळाल्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.

 

*कर्ली-तारकर्ली प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत*

 

या प्रकल्पांतर्गत कर्ली ते तारकर्ली या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सध्या रस्ते मार्गाने जादा वळणांमुळे सुमारे २५ ते ३० किलोमीटरचा आणि एक ते दोन तासांचा प्रवास करावा लागतो. आधुनिक जलवाहतुकीमुळे हा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांचा वेळ वाचणार असून रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वाहनांच्या इंधनाचा अपव्यय कमी होण्यास मदत होणार आहे.

 

*पाच जलमार्गांना प्राधान्य*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक स्तरावर पाच प्रमुख जलमार्गांचा विचार करण्यात आला आहे.

कर्ली – तारकर्ली

कर्ली – देवबाग

देवबाग – निवती

विजयदुर्ग, अनुसरे – दांडे

आरोंदा – किरणपाणी

या जलमार्गांमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना थेट जलमार्गाने जोडणी मिळून पर्यटनासाठी नवी ‘लाईफ लाईन’ निर्माण होणार आहे.

 

*चिपी विमानतळ, आणि प्रमुख पर्यटनस्थळांना फायदा*

 

कर्ली-तारकर्ली जलवाहतूक सुरू झाल्यास चिपी विमानतळ, वेंगुर्ला तालुका तसेच शेजारील गोवा राज्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे. मालवण, वायरी, तारकर्ली आणि देवबाग या प्रमुख पर्यटन क्षेत्रांमध्ये जलमार्गाने जलद आणि थेट आवागमन शक्य होईल. परिणामी पर्यटकांचा ओघ आणि मुक्काम वाढण्यास मदत होऊन स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

*’रिव्हर्स मायग्रेशन’ला मिळणार बळ*

 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या संकल्पनेला या प्रकल्पामुळे मोठे बळ मिळणार असल्याचे विष्णू मोंडकर यांनी सांगितले. रोजगाराच्या शोधात मुंबईसह मोठ्या शहरांकडे गेलेल्या कोकणातील तरुणांना आपल्या मुळगावीच व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटनाचा विस्तार महत्त्वाचा ठरणार आहे.

 

जलवाहतूक वाढल्याने हॉटेल्स, होमस्टे, वॉटर स्पोर्ट्स, गाईड सेवा, वाहतूक तसेच विविध पूरक पर्यटन व्यवसायांना चालना मिळून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

 

जहाजबांधणी व सागरी अभियांत्रिकीला संधी

हा प्रकल्प केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला व्यापक चालना देणारा ठरणार आहे. आधुनिक जहाजबांधणी (Shipbuilding) आणि सागरी अभियांत्रिकी (Marine Engineering) क्षेत्राला जिल्ह्यात मोठा वाव मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात जलवाहतुकीशी संबंधित सेवा व व्यवसाय स्थानिक पातळीवर विकसित झाल्यास त्याचा थेट फायदा स्थानिकांना होऊ शकतो.

सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देणारा हा प्रकल्प ठरेल. जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन, दळणवळण आणि स्थानिक अर्थकारणाला बळ मिळून ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली.