तिघांना अटक ; चोरीचा ऐवज जप्त
सावंतवाडी:
ओवळीये येथे झालेल्या घरफोडीचा सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना तात्काळ अटक केली असून चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे ओवळीये येथील रहिवासी कौस्तूभ विष्णू यांच्या राहत्या घरी ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ५:३० ते १०:०० वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी घराची कौले काढून आत प्रवेश करत घरातून २,०५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ (ए) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच सावंतवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक मुद्द्यांचा सखोल तपास करून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. यामध्ये हरेश सनी पवार (वय १८, रा. कोलगाव, ता. सावंतवाडी), किरण चंद्रकांत महाडीक (वय २७, रा. मिलिंदनगर, दिवा, जि. ठाणे) आणि ऋतिक राजेश गोळपकर (वय २६, रा. सेंट मेरी चर्च, पत्रा चाळ, परेल रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई) या तिघांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून चोरीस गेलेले ४१ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी सध्या पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक दिपक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, तसेच पोलीस हवालदार मनिष शिंदे, संतोष गलोले, रामदास जाधव आणि गौरव परब यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.













