अखेर श्रृंगारतळी पथदीपांनी उजळली

महामार्ग प्राधिकरणाने मीटर आणि थकीत वीजबिल भरले

गुहागर प्रतिनिधी:
तालुकाची आर्थिक राजधानी शृंगारतळी अंतिम
बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पथदीपांनी उजळली. मीटर जोडणी व थकलेले वीजबील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भरल्याने महावितरणने ताबडतोब मीटर बसवून पथदीप प्रज्वलीत केले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच बाजारपेठेत पथदीपांचा लख्ख प्रकाश पडलेला दिसून आला.
बरेच महिने श्रृंगारतळी बाजारपेठेतील पथदीप बंद होते. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराने वीजबील न भरल्याने हे पथदीप बंद होते. अखेर थकीत रक्कम पाहून महावितरणने मीटरची जोडणी तोडली होती.
त्यामुळे पथदीपांअभावी नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. आर्थिक राजधानी श्रृंगारतळी अंधारात असल्याने हा गंभीर विषय लक्षात घेऊन पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्ती समितीने वारंवार महामार्ग प्राधिकरणाला पत्रव्यवहार करुनसुध्दा त्यांनी याकडे लक्ष दिले नव्हते. उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. तसेच तत्कालीन तंटामुक्ती अध्यक्ष अजित बेलवलकर, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ यांनी पाठपुरावा सुरू केला होता. याला संपूर्ण ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले. अखेर प्राधिकरणाला याची दखल घ्यावी लागली. मीटरचे पैसे व थकीत वीजबील भरल्याने पथदीप सुरू करण्यात आले.