वनगुळे सुतारवाडी येथील हरहुन्नरी तरूण पंकज पांचाळ यांचा देखावा ठरतोय लक्षवेधी
संतोष कोत्रे
लांजा -: गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात विविध देखावे सादर करून त्याद्वारे समाज प्रबोधन करणार्या तालुक्यातील वनगुळे येथील पंकज पांचाळ व कुटूंबियांनी यावर्षी श्री समर्थ बैठकीचा देखावा सादर केला असून त्याद्वारे समाजप्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न आहे.
नोकरी व्यवसाया निमित्ताने मुंबई येथे वास्तव्याला असलेल्या पंकज गणेशोत्सवात आपल्या वनगुळे गावी दाखल होतो. संपूर्ण पांचाळ कुटुंब गणेशोत्सव उत्साहात साजरा करते. पंकज हा गेली कित्येक वर्षे समाजप्रबोधन करणारे देखावे सादर करून समाज प्रबोधित करत आहे. स्वतः उत्तम छायाचित्रकार असलेला पंकज भविष्यात अजून उत्तम देखावे तयार करेल हे त्याच्या नजरेतून दिसून येते.
श्री नानासाहेब व त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी व धर्माधिकारी कुटुंबीय हे गेली कित्येक वर्षे कलियुगामध्ये परमार्थ पेरण्याचे उत्तम कार्य करत आहेत. त्यांच्या कार्यातील एक भाग म्हणजे श्री समर्थ बैठक. या बैठकीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिर व अन्य सामाजिक उपक्रम राबविले जातात.
हजारो श्री सदस्य या बैठकीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर प्रहार करून समाज पबोधन करण्याचे काम गेले अनेक वर्षे केले जात आहे. या देखाव्यातून सामाजिक प्रबोधन साधण्याचा प्रयत्न पंकज पांचाळ यांनी केला आहे. हा देखावा साकारण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजप्रबोधन हा आहे.
हा देखावा सादर करत असताना पंकज पांचाळ यांना त्याच्या कुटुंबीयांसह संजय मेस्त्री, किशोर मेस्त्री, राजेश मेस्त्री, तेजस मासये यांनी मदत केली
मूर्तिकार आनंद मेस्त्री यांच्या हस्त कौशल्यातून साकारलेले लेखणी गणेश मूर्ती आणि हा देखावा सध्या गणेश भक्तांसाठी लक्षवेधी ठरला आहे.










