२५ ते २७ सप्टेंबरदरम्यान तामिळनाडूत रंगणार चुरशीची स्पर्धा; राज्य संघात सिंधुदुर्गातील दोन खेळाडूंची निवड
आचरा –अर्जुन बापर्डेकर
तामिळनाडू येथे दि. २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या तिसऱ्या नॅशनल फेडरेशन क्लब २०२६ पॅरासिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आचरा येथील शिल्पा गोविंद गांवकर-डोंगरे हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. महाराष्ट्र स्टेट पॅरासिटींग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्मिता गावडे आणि शिल्पा गांवकर यांच्यासह सांगलीच्या स्वाती भस्मे व जयश्री शिंदे, परभणीच्या गायत्री इंगळे, पालघरच्या तेजस्वी पुजारे, कोल्हापूरच्या आस्मा स्वार, चंद्रपूरच्या मीनल दोडके व भावना अत्राम तसेच अमरावतीच्या ऋतुजा कवठाळे अशा एकूण दहा महिला खेळाडूंची निवड झाली आहे.
आचरा येथील शिल्पा गांवकर-डोंगरे हिच्या या निवडीमुळे सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी स्पर्धेत शिल्पाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











