चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगार सज्ज, रविवारी मुंबई-बोरीवली मार्गावर सोडणार सर्वाधिक १०३ फेर्या

गणेश भक्तांसाठी लांजा आगारातून १५७ जादा बसेसचे आरक्षण फुल्ल

संतोष कोत्रे
लांजा -: गणेशोत्सवासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा एसटी आगार सज्ज झाले आहे. गणेश भक्तांसाठी एकूण १५७ जादा बसगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
उद्या रविवारी २० सप्टेंबर रोजी सर्वाधिक १०३ एसटी फेर्या लांजा आगारातून मुंबई -बोरीवली मार्गावर सोडण्यात येणार आहेत.
या वर्षी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी गावागावात दाखल झाले आहेत. पाच दिवसांच्या गणपतींना शनिवारी १९ सप्टेंबर रोजी निरोप देण्यात आल्यानंतर आता चाकरमानी पुन्हा मुंबईकडे परतु लागले आहेत. यासाठी या चाकरमान्यांसाठी लांजा आगार सज्ज झाले आहे. आगारामार्फत आत्तापर्यंत १४७ फेर्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे .खासगी आराम बसच्या तुलनेत यावर्षी प्रवाशांचा अधिक ओढा हा एसटी बसकडे वाढलेला आहे .
गतवर्षी मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी लांजा आगारातून ७० बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या.‌ यावर्षी मात्र जादा फेऱ्यांचे आरक्षण आहे. यामध्ये शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर लांजा आगारातून ५ जादा बस मुंबईकडे रवाना झाल्या. उद्या रविवारी सर्वाधिक १०३ फेऱ्या या मुंबई मार्गावर सोडण्यात येणार आहेत. यामध्ये बोरीवली मार्गावर ३६ तर मुंबई, कल्याण, नालासोपारा या मार्गावर उर्वरित बस सोडण्यात आल्या. यामध्ये ४७ ग्रुप बुकिंग फेर्या व इतर अशा एकूण १५७ फेर्याचा समावेश आहे.
याबरोबरच सोमवारी २१ सप्टेंबर रोजी आगारातून ४४ जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. तर २७ सप्टेंबर पर्यंत मुंबई व बोरीवली मार्गावर दररोज दोन जादा फेऱ्या धावणार आहेत.
या सर्व फेऱ्या या लांजा, बोरिवली, मुंबई सेंट्रल, लांजा ठाणे, कल्याण, बोरिवली, नालासोपारा, पुणे आदी मार्गावर सोडण्यात येणार आहेत. पैकी मुंबई बोरिवली या मार्गावर सर्वाधिक फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे यांनी दिली.
मुंबई मार्गावर सडण्यात येणाऱ्या एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी लांजा एसटी आजारातील कारागीर श्री यादव, श्री धर्मे व त्यांचे सर्व टीम यांनी मेहनत घेतली आहे.