महिला निवारा केंद्रातही खाऊवाटप
भाजपा महिला मोर्चाचा उपक्रम
सावंतवाडी :
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी भाजप महिला मोर्चाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना तसेच चिताराळी येथील महिला निवारा केंद्रातील महिलांना फळे आणि खाऊचे वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप महिला मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.
या सामाजिक उपक्रमाच्या वेळी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, मेघा बोकटे, साक्षी गवस, भावना नार्वेकर, तृप्ती विनोदकर आणि रूपाली रेमुळकर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाचा आणि सामाजिक व विकासकार्याचा गौरव केला. “कोकणचे सुपुत्र असलेल्या रवींद्रजी चव्हाण यांनी केसरी येथील दुर्गम भागात महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हा प्रकल्प भविष्यात राष्ट्रीय स्तरावर पोहोचून संपूर्ण भागाचे नाव उज्ज्वल करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना मडगावकर म्हणाल्या, “सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रवींद्रजी चव्हाण यांनी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य केले. त्यांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपची सत्ता स्थापन होऊ शकली.” याबद्दल त्यांनी रवींद्रजी चव्हाण यांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी, आमदार रवींद्रजी चव्हाण यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे आणि भविष्यात त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी सोपवली जावी, अशी प्रार्थना गणपती चरणी करण्यात आल्याचे मोहिनी मडगावकर यांनी सांगितले.












