पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात तालुक्यात एकूण १३ हजार ५८८ घरगुती बाप्पांना निरोप

ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल फुलांचा वर्षाव करीत तालुक्यात गणेशभक्तांकडून भावपूर्ण निरोप

 

लांजा (प्रतिनिधी):  गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल व फुलांचा वर्षाव करीत लांजा तालुक्यात ठिकठिकाणी गणेश भक्तांकडून लाडक्या बाप्पाला व गौराईला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शनिवारी १९ सप्टेंबर रोजी तालुक्यात एकूण १३ हजार ५८८ घरगुती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या वर्षी १४ सप्टेंबर रोजी तालुक्यात विघ्नहर्त्याचे गावागावात जल्लोषी मिरवणुकीने स्वागत झाले होते. गेले सहा दिवस बाप्पांच्या पूजा, आरत्या यात रममाण झालेल्या गणेशभक्तांना शनिवारी त्याला निरोप द्यावा लागला. सहा दिवसांच्या या विघ्नहर्त्याला अत्यंत भावपूर्ण वातावरणात भक्तगणांकडून निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत लहान थोरांकडून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी तालुक्यात ठिकठिकाणी सजलेल्या हातगाड्या, चारचाकी वाहनातून बाप्पांचे विसर्जन स्थळी आगमन झाले .सायंकाळी तीन वाजल्यापासून गणेश मूर्ती विसर्जनाचे कार्यक्रम सुरू झाले.

लांजा शहरातील लांजा बाजारपेठ, शेट्ये वाडी, सनगरवाडी, शेवरवाडी आदी परिसरातील घरगुती गणपतींचे विसर्जन शहरातील ओझर पर्या, आडाचा पर्या तसेच बेनी नदी येथे करण्यात आले. लांजा कोत्रेवाडी येथे देखील वहाळात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, सजलेल्या हातगाड्या, चारचाकी वाहनातून कोत्रेवाडी येथे बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

दरम्यान लांजा शहरात गणेश मूर्ती विसर्जन वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बरोबरच होमगार्ड देखील तैनात करण्यात आले होते. रात्री आठ वाजेपर्यंत गणेश मूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम सुरू होता.