प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पाले येथे मोफत श्रवण यंत्रांचे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते वाटप
मंडणगड : भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने मंडणगड तालुक्यातील पाले येथे गरजू कर्णबधिर नागरिकांना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या पुढाकारातून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आंबवणे खुर्द येथील श्रीमती शेवंती फोपले यांना श्रवण यंत्र जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते देण्यात आले. श्रवण यंत्रामुळे कुटुंबीयांशी संवाद साधणे, दैनंदिन व्यवहार करणे आणि सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने सहभागी होणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे
यावेळी अभिजीत देवळेकर यांनी कर्णबधिर नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “राजकारणासोबत समाजसेवाही महत्त्वाची असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचला पाहिजे,” या भावनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष विजय दुर्गवले, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री देवळेकर, एकता दुर्गवले, करण दुर्गवले, हृतिक मुरुडकर, सानिका दुर्गवले, सलोनी दुर्गवले, वैशाली दुर्गवले, तेजस दुर्गवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. श्रवण यंत्र मिळाल्यानंतर वयोवृद्ध आजीच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य आणि डोळ्यांतील आनंदच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना पाले येथील राणी दुर्गवले यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.












