पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून देवगड-जामसंडे नगरपंचायतीस एक फॉगिंग मशीन उपलब्ध

आणखी दोन मशीन चार दिवसांत मिळणार; सभापती बुवा तारी यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद

देवगड : प्रतिनिधी

 

देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन फॉगिंग मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून एक फॉगिंग मशीन तातडीने उपलब्ध करून देण्यात आली असून, आणखी दोन फॉगिंग मशीन येत्या चार दिवसांत उपलब्ध होणार आहेत.

 

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे कार्यक्षेत्र सुमारे ३१ चौरस किलोमीटर असून, नगरपंचायत क्षेत्रात एकूण १७ प्रभाग आहेत. सध्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. त्यातच पावसाळ्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डास नियंत्रणासाठी नियमित व प्रभावी फॉगिंग करणे आवश्यक आहे.

 

पावसाळ्यात तसेच त्यानंतरच्या कालावधीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, उपलब्ध फॉगिंग यंत्रसामग्री अपुरी असल्याने संपूर्ण १७ प्रभागांमध्ये आवश्यक त्या वारंवारतेने फॉगिंग करणे अडचणीचे ठरत होते.

 

या पार्श्वभूमीवर सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) अंतर्गत देवगड-जामसंडे नगरपंचायतीस तीन फॉगिंग मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. या मागणीवर पालकमंत्र्यांनी तत्काळ कार्यवाही करत एक फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिले आहे. उर्वरित दोन मशीनही येत्या चार दिवसांत उपलब्ध होणार असल्याने नगरपंचायत क्षेत्रातील डास नियंत्रणाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहे.

 

तीनही फॉगिंग मशीन उपलब्ध झाल्यानंतर नगरपंचायतीच्या १७ प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार नियमित फॉगिंग करता येणार असून, डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी मागणीची तत्काळ दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबद्दल नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.