एनएसएसचे ४८ स्वयंसेवक आणि नगरपंचायतीचे १० कर्मचारी सहभागी; निर्माल्य, प्लास्टिक व घनकचऱ्याची केली स्वच्छता
कणकवली : कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कणकवली नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गणपती विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी गणपती साना येथे स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे ४८ स्वयंसेवक तसेच कणकवली नगरपंचायतीचे १० कर्मचारी सहभागी झाले.
गणपती विसर्जनानंतर गणपती साना परिसरात जमा झालेले निर्माल्य, कचरा, प्लास्टिक तसेच इतर घनकचरा स्वयंसेवकांनी व्यवस्थित गोळा केला. गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कणकवली कॉलेजचे प्राचार्य श्री. युवराज महालिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान व्यवस्थित पार पडले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होते, असे प्राचार्य युवराज महालिंगे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. किरण जगताप, प्रा. पूजा मुंज, डॉ. गणेश टेकाळे, श्री. सागर गावडे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून स्वच्छता शिबिर यशस्वीपणे पार पडले.












