११ जणांवर कारवाई ; ४४ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील एका घरात सुरू असलेल्या सोशल व स्पोर्ट्स क्लबवर सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी दुपारी अचानक छापा टाकला. या छाप्यात अनधिकृतपणे रमी जुगार खेळणाऱ्या ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माठेवाडा येथील एका घरात क्लब स्थापन करून त्याच्या आडोशाने जुगार अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी दुपारी माठेवाडा येथील त्या घरावर अचानक धाड टाकली. वेळी तेथे काही जण रमी जुगाराची खेळी मांडून जुगार खेळत असल्याचे रंगेहात आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सर्व ११ जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ४४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, सात दुचाकी, १२ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रूपेश सावंत, गौरव गावडे, अखिल बडीवले, पुंडलिक सावंत, जेरॉन रॉड्रिक्स, सुनील सावंत, संतोष राऊळ, संजय गोंदावळे, शंकर सावंत, प्रभाकर कदम आणि रामकृष्ण आडके यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस कर्मचारी धोत्रे आणि पोलीस कर्मचारी दीपक शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.












