मंडणगड प्रतिनिधी: पंचायत समिती मंडणगड महिला व बालकल्याण विभाग यांच्यावतीने सेवा संकल्प अभियान २०२६ व राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत मंडणगड तालुक्यात अंगणवाडी पोषण आहारातील कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी २ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समितीचे राजमाता जिजाऊ सभागृहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात देव्हारे, पणदेरी, कुंबळे, उमरोली आणि मंडणगड या पाच बिटमधील अंगणवाड्यांनी सहभाग घेतला.
अंगणवाडीतील पोषण आहारातून तयार करण्यात आलेल्या विविध कल्पक पदार्थांची स्पर्धा घेण्यात आली. पोषणमूल्य, पदार्थाची मांडणी, नावीन्यपूर्ण कल्पना आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
या स्पर्धेत मधुमालती ग्रुपच्या संयोगिता खैरे यांनी प्रथम क्रमांक, झिनिया ग्रुपच्या सुचिता गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक, तर मोगरा ग्रुपच्या अश्विनी दळवी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये स्थानिक व पौष्टिक पदार्थांचा वापर, त्यांची विविधता आणि आकर्षक सादरीकरण यावर भर देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, तालुका आरोग्य अधिकारी अभिषेक गावंडे आणि गटशिक्षणाधिकारी पराग शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, श्री. गोलांबडे, पंचायत समिती उपसभापती दीपक मालुसरे, सदस्य दीप्ती घडशी आणि इरफान बुरोंडकर यांची उपस्थिती होती.
या उपक्रमाचे आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वरी दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका सुनंदा पोंदे, स्वाती ठाकरे तसेच वरिष्ठ सहाय्यक अविनाश गुणदेकर आणि आकाश गायकवाड यांनी केले. अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.












