रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ₹६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण!

 ३० सप्टेंबर २०२६ अखेर ₹४९ कोटी १३ लाखांहून अधिकचा घसघशीत नफा

 ग्राहकांच्या विश्वासाला आणि उत्कृष्ट सेवांना यश; राज्यातील अग्रगण्य बँक म्हणून वाटचाल सुरूच

 लवकरच अत्याधुनिक AEPS सुविधेचा लाभ मिळणार

रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ₹६००० कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. ग्राहकांचा दृढ विश्वास आणि उत्कृष्ट व विनम्र सेवांच्या जोरावर बँकेने अर्धवार्षिक अहवालानुसार ३० सप्टेंबर २०२६ अखेर हा बहुमान मिळवला आहे.
नफ्यात घसघशीत वाढ
बँकेने ३० सप्टेंबर २०२६ अखेर ₹६००० कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय यशस्वीपणे पूर्ण केला असून, यादरम्यान बँकेचा नफा ₹४९ कोटी १३ लाख ३६ हजार इतका झाला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत नफ्यात ₹१० कोटी ७४ लाखांची घसघशीत वाढ झाली असून, बँकेने आपल्या यशाची कमान अशीच उंचावली आहे.
डिजिटलायझेशन आणि ग्राहक सेवांवर भर
राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून नावलौकीक असलेल्या या बँकेने ग्राहक सेवा व आधुनिकतेला विशेष महत्त्व दिले आहे. बँकेमार्फत सध्या NEFT, RTGS, ATM, Mobile Banking आणि QR Code यांसारख्या आधुनिक सुविधा ग्राहकांना देण्यात येत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील ग्राहकांच्या सोयीसाठी बँक लवकरच AEPS (Aadhaar Enabled Payment System) ही सुविधा कार्यान्वित करत आहे. विशेष म्हणजे, AEPS सुविधा देणाऱ्या राज्यातील मोजक्या ३ जिल्हा बँकांमध्ये रत्नागिरी बँकेचा समावेश होत आहे.
संचालक मंडळ आणि प्रशासनाचे आभार
गतवर्षीच्या तुलनेत बँकेने ठेवी, कर्ज व नफ्यात लक्षणीय वाढ साध्य केली आहे. या यशस्वी वाटचालीबद्दल बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालक महोदयांनी बँकेचे सभासद आणि ग्राहकांचे आभार मानले आहेत. ग्राहकांचे सहकार्य आणि बँकेवरील त्यांचा दृढ विश्वास असाच कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संचालक मंडळाने घेतलेले अचूक निर्णय आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले, असे मत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी व्यक्त केले आहे. बँकेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.