मंडणगड (प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या पुढाकाराने ओढ्याजवळ जेसीबीच्या साहाय्याने बंधारा बांधण्यात आला.
देव्हारे परिसरातील ओढ्याची पाण्याची पातळी कमी होत असल्याची बाब लक्षात घेऊन पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. बंधाऱ्यामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात अडवून पाणीसाठा वाढण्यास तसेच भूजलपातळी टिकवून ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः गुरेढोरे तसेच परिसरातील वन्य व इतर प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राहावी, या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला. उन्हाळ्यात अथवा पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या काळात या जलसाठ्याचा पशुधन व प्राण्यांना मोठा उपयोग होऊ शकतो.
‘सेवा संकल्प अभियान’ केवळ सामाजिक उपक्रमांपुरते मर्यादित न ठेवता पर्यावरण, जलसंधारण आणि पशुपक्ष्यांच्या हितासाठीही प्रत्यक्ष कृतीतून योगदान देण्याचा प्रयत्न असल्याचे अभिजीत देवळेकर यांनी सांगितले.
पाणी हीच जीवनाची मूलभूत गरज असून, उपलब्ध पाण्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश देत देव्हारे येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम परिसरासाठी उपयुक्त ठरत आहे.













