भाजीपाला मित्र मंडळ फोंडाघाटचा धाडसी प्रयत्न नागरिक अबालवृध्द महिला पुरुषांची अलोट गर्दी
बाहुल्यांचा नाद आणि ढोल ताशांच्या जयघोषात युवाई बच्चे कंपनी थिरकली
फोंडाघाट : कुमार नाडकर्णी –
विशेषतः विष्णू आणि शिवाच्या अघोर तपश्चर्या साधनेत डोंगर कपारीत राहणारे भगवान शिवाचे भैरवरूप साधू -, अंगाला भस्म- राख, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, विचित्र शृंगार, विचित्र हावभाव करून गुढ,रहस्यमय, आणि आक्रमकतेने शिवतांडव नृत्य करतात. या त्यांच्या भयावह शिव उपासनेच्या माध्यमातून, नृत्यातून शिवाला प्रसन्न करून, स्वतःसाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी, एकत्र येऊन रहस्यमय नृत्य करतात. महाकुंभ मेळाव्यामध्ये अशा प्रकारचे साधू एकत्र येऊन हे प्रकार पाहावयास मिळतात. हा धाडसी देखावा फोंडाघाटच्या भाजीपाला मित्र मंडळाने पुन्हा एकदा,तब्बल वीस वर्षांनी अघोरी जल्लोषात सादर केला….
यासोबत ढोल पथकाचा दणदणाट ,डीजेची ऊर्जा, आणि बाहुल्यांचा नाच यासोबत बच्चे कंपनी, युवाई मनमुराद थिरकत होती.पताकांचा यांचा स्फोटक वर्षाव ,बर्फाचे फवारे आणि बेधुंद तरुणाई– यामुळे संपूर्ण पेठेत उत्साहाचे,चैतन्याचे भारावलेपण दिसून येत होते. मंडळाने केलेल्या अल्पोपहार स्टॉलवर सुद्धा गर्दी होती.या सर्व देखाव्यासाठी फोंडाघाट पंचक्रोशीतील नागरिक, अबालविरुद्ध महिला- पुरुषांची रात्री उशिरापर्यंत अलोट गर्दी झाली होती. पेठेतील रस्त्यावरील वाहतुकीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुलभ नियंत्रण ठेवले होते. एकंदरीत या धाडसी देखाव्याचे सर्वांनीच मनमुराद कौतुक केले, आणि आनंद लुटला…













