पाट हायस्कूलला शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांची सदिच्छा भेट…

विद्यार्थ्यांशी साधला संवाद; वनराई बंधाऱ्यासाठी विद्यार्थ्यांसोबत केले श्रमदान

वेंगुर्ले : दाजी नाईक
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी बुधवारी एस. एल. देसाई विद्यालय, पाट हायस्कूलला सदिच्छा भेट देत शाळेतील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शिक्षक, पालक संघाचे पदाधिकारी तसेच पालकांशी संवाद साधून शाळेतील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. भुसे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर वर्गांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत प्रश्न विचारून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपल्या शैक्षणिक अनुभवांची माहिती दिली.

यावेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांसोबत वनराई बंधारा उभारण्यासाठी श्रमदान केले. तसेच भातशेतीची पाहणी करून शेतातील पीक परिस्थितीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि शेतीविषयक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती घोडमीसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, जिल्हा परिषद सदस्य सौ. यज्ञा साळगावकर, शिवसेना विभागप्रमुख तथा एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दत्ता साळगावकर, मुख्याध्यापक सयाजी बोंदर, वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.